Video : इथे सुरक्षारक्षक का नाही? महापौरांचा अधिकाऱ्यांना सवाल
By किरण शिंदे | Updated: February 17, 2026 14:47 IST2026-02-17T14:46:11+5:302026-02-17T14:47:31+5:30
या पाहणीत सुरक्षा व्यवस्थेतील त्रुटी उघड झाल्याने महापौरांनी सुरक्षा विभागातील अधिकाऱ्यांची चांगलीच कानउघडणी केली.

Video : इथे सुरक्षारक्षक का नाही? महापौरांचा अधिकाऱ्यांना सवाल
पुणे - पदभार स्वीकारल्यानंतर लगेचच प्रशासनात शिस्त आणण्याच्या दृष्टीने पावले उचलत, मंजुषा नागपुरे यांनी पुणे महानगरपालिका मुख्य प्रशासकीय भवनाची अचानक पाहणी केली. या पाहणीत सुरक्षा व्यवस्थेतील त्रुटी उघड झाल्याने महापौरांनी सुरक्षा विभागातील अधिकाऱ्यांची चांगलीच कानउघडणी केली. या दरम्यानचा व्हिडिओ चर्चेत आला आहे.
अचानक पाहणीत काय आढळले?
सोमवारी सकाळी महापौर नागपुरे यांनी मुख्य भवनाच्या प्रवेशद्वाराची तपासणी केली.यावेळी काही ठिकाणी सुरक्षारक्षक अनुपस्थित असल्याचे दिसून आले. महापौरांनी तत्काळ संबंधित अधिकाऱ्यांना विचारणा करत स्पष्ट शब्दांत सांगितले की, महापालिकेसारख्या महत्त्वाच्या प्रशासकीय इमारतीत सुरक्षा व्यवस्थेत कोणतीही ढिलाई चालणार नाही. यावेळी महापौरांनी सुरक्षा विभागाला पुढील सूचना दिल्या त्या म्हणाल्या, प्रवेशद्वारांवर २४ तास सुरक्षारक्षक उपस्थित असावेत, सीसीटीव्ही व्यवस्था नियमित तपासावी, अभ्यागत नोंदणी प्रक्रिया काटेकोर करावी, सुरक्षा यंत्रणेचे नियमित ऑडिट करावे, तसेच, त्रुटी तातडीने दूर करून अहवाल सादर करण्याचे आदेश देण्यात आले.
प्रशासनात शिस्तीचा संदेश
नवनियुक्त महापौरांनी पदभार स्वीकारल्यानंतर पहिल्याच आठवड्यात घेतलेल्या या कारवाईमुळे प्रशासनात शिस्त आणि जबाबदारीचा स्पष्ट संदेश गेला आहे. शहरातील नागरिकांच्या सुरक्षेबाबत महापालिका गंभीर असल्याचे त्यांनी यावेळी अधोरेखित केले.