पुण्यात 'पाताळ लोक' तयार करणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी सांगितला अख्खा प्लॅन
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 7, 2026 20:33 IST2026-01-07T20:32:14+5:302026-01-07T20:33:00+5:30
हे पातळ लोक म्हणजे जमिनीवर जागा नाही. उड्डाणपूल बांधले त्यामुळे आकाशात जागा नाही. आता पाताळात जायचा निर्णय घेतला आहे असं मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

पुण्यात 'पाताळ लोक' तयार करणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी सांगितला अख्खा प्लॅन
पुणे - पुण्याचा विस्तार मोठ्या प्रमाणात वाढला असून याठिकाणी वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी आम्ही पाताळ लोक तयार करण्याचा निर्णय घेतला आहे अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. पुण्यातील भाजपा उमेदवारांच्या प्रचारसभेत ते बोलत होते. त्यावेळी फडणवीस यांनी पुण्यातील विविध विकास कामांबाबत जनतेला माहिती दिली.
यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, एकीकडे मेट्रोचे जाळे आणि दुसरीकडे ४ हजार इलेक्ट्रिक बस आपण घेतोय. पुण्यातील ३२ रस्त्यांचे विस्तारीकरण करण्यात येणार आहे. एआयचा वापर करून वाहतूक कोंडीवर काय उपाय करता येतील हे शोधून काढले आहे. ८ उड्डाणपूलाचे काम प्रगतीपथावर आहे. १३ नवीन उड्डाणपूल तयार करण्यात येतील. पुण्याची वाहतूक गतिमान करण्याचा आमचा प्रयत्न आहे. पुण्याचे रस्ते पूर्व आणि पश्चिम आहेत. पुण्याचा विस्तार पाहिला तर इथले प्रमुख रस्ते पूर्व पश्चिम आहेत तर उत्तर दक्षिण पुणे गजबजलेले आहेत. उत्तर दक्षिण पुण्यात रस्ते छोटे आहेत. त्यामुळे पुण्यात नवीन जागा तयार करू शकत नाही. म्हणून पुण्याची वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी आम्ही पाताळ लोक तयार करणार आहोत असं त्यांनी सांगितले.
हे पातळ लोक म्हणजे जमिनीवर जागा नाही. उड्डाणपूल बांधले त्यामुळे आकाशात जागा नाही. आता पाताळात जायचा निर्णय घेतला आहे. पुण्यात वाहतूक सुधारणा करण्यासाठी आम्ही पाताळात जाणार आहोत. जवळफास ५४ किमी भुयारी मार्ग म्हणजे पाताळातील रस्ते या पुण्यात तयार करणार आहोत. त्यातील पहिला मार्ग कात्रजपासूनच सुरू करणार आहोत. त्यात येरवडा, स्वारगेट, सिंहगड, पाषाण, खडकी, कात्रज हा सगळा भाग आम्ही समाविष्ट करणार आहोत. हे मी फक्त हवेत बोलत नाही तर त्याचा प्लॅन आणि नकाशा आम्ही तयार केला आहे असंही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं.
दरम्यान, हे भूयारी मार्ग तयार करणे, ३२ रस्त्यांचे विस्तारीकरण करणे आणि नवीन येणारे उड्डाणपूल या माध्यमातून पुण्यातील वाहतूक कोंडीतून सुटका करण्यासाठी चालना देऊ. जवळपास ३२ हजार कोटी रुपये हे भूयारी रस्त्यांसाठी आम्ही वापरणार आहोत. पुण्याला रिंग रोड करत आहोत. १२ पैकी ९ पॅकेजचं काम सुरू असून त्यासाठी ५७ हजार कोटी दिलेत. १६९ किमीचा हा रिंग रोड आहे. यामुळे पुण्यात येणारी वाहतूक तब्बल ४० टक्क्यांनी कमी होईल. यासोबतच पुणे-नगर, पुणे-सोलापूर, पुणे-नाशिक या रस्त्यावर डबल डेकर पूल तयार करण्यात येईल. त्यात खाली रस्ता, त्यावर उड्डाणपूल आणि त्यावरच्या पूलावर मेट्रो असा आराखडा आहे. म्हणून हे व्हिजन घेऊन आम्ही पुणेकरांसमोर आलो आहे असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.