PMC Elections : महापालिका निवडणुकीसाठी तिरंगी की चौरंगी लढत? आज चित्र स्पष्ट होणार
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 30, 2025 16:40 IST2025-12-30T16:39:24+5:302025-12-30T16:40:40+5:30
भाजपला शह देण्यासाठी राष्ट्रवादी कॉंग्रेस (अजित पवार) आणि राष्ट्रवादी (शरद पवार) दोन्ही एकत्र आल्यामुळे निवडणूक चुरशीची होणार आहे.

PMC Elections : महापालिका निवडणुकीसाठी तिरंगी की चौरंगी लढत? आज चित्र स्पष्ट होणार
पुणे : पुणे महापालिका निवडणुकीसाठी भाजप, शिंदेसेना, आरपीआय यांची युती होणार आहे. पण भाजप आणि शिंदेसेनेची अधिकृत युती जाहीर झालेली नाही. दोन्ही राष्ट्रवादी कॉंग्रेसची आघाडी आणि कॉंग्रेस, उद्धवसेना व मनसे यांची आघाडी झाली आहे. त्यामुळे भाजप आणि शिंदेसेनेची अधिकृत युती, तर पुणे महापालिकेची निवडणूक तिरंगी आणि भाजप आणि शिंदेसेनेची युती न झाल्यास चौरंगी लढत होण्याची शक्यता आहे. उमेदवारी अर्ज भरण्याच्या म्हणजे शेवटच्या दिवशी राजकीय चित्र स्पष्ट होणार आहे. भाजपला शह देण्यासाठी राष्ट्रवादी कॉंग्रेस (अजित पवार) आणि राष्ट्रवादी (शरद पवार) दोन्ही एकत्र आल्यामुळे निवडणूक चुरशीची होणार आहे.
पुणे महापालिका निवडणूक जाहीर झाल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाजप आणि शिंदेसेना एकत्र लढणार आहे. राष्ट्रवादी (अजित पवार) बरोबर मैत्रीपूर्ण लढत होणार असल्याचे जाहीर केले होते. जागा वाटपावरून भाजप आणि शिंदेसेनेत अद्याप चर्चा सुरू आहे. या दोन्ही पक्षांचे जागावाटप घोषित करण्यात आलेले नाही. मात्र हे दोन्ही पक्ष एकत्र लढणार असल्याचे दोन्ही पक्षांचे नेते ठामपणे सांगत आहेत. पालिका निवडणुकीसाठी राष्ट्रवादी (अजित पवार) आणि राष्ट्रवादी (शरद पवार) या दोन्ही राष्ट्रवादीच्या जागावाटप आणि निवडणूक चिन्हावरून मतभेद झाल्याने चर्चा फिस्कटली होती. त्यानंतर गेल्या दोन दिवसांत राष्ट्रवादी (शरद पवार) पक्षाचे पदाधिकारी हे महाविकास आघाडीच्या बैठकीला हजेरी लावत होते. मात्र, महाविकास आघाडीच्या बैठकीला अचानकपणे राष्ट्रवादी (शरद पवार) यांच्या पक्षातील कोणताही पदाधिकारी उपस्थित राहिला नाही. त्यामुळे पिंपरी-चिंचवड महापालिकेपाठोपाठ पुणे महापालिकेच्या निवडणुकीसाठी राष्ट्रवादी (अजित पवार) आणि राष्ट्रवादी (शरद पवार) दोन्ही एकत्र आले.
त्याबाबतची अधिकृत घोषणा राष्ट्रवादी कॉंग्रेस (शरद पवार) गटाचे आमदार रोहित पवार यांनी केली आहे. त्यामुळे दोन्ही राष्ट्रवादी एकत्र निवडणूक लढविणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. पालिका निवडणूक काँग्रेस आणि उद्धवसेना एकत्र लढणार आहेत. उद्धवसेनेची आणि मनसेची युती झाली आहे. उद्धवसेनेच्या वाट्याला आलेल्या जागेतून मनसेला काही जागा देण्यात येणार आहे. भाजप आणि शिंदेसेनेची युती न झाल्यास चौरंगी लढत होण्याची शक्यता आहे. दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्याने निवडणूक चुरशीची होणार
राष्ट्रवादी कॉंग्रेस (शरद पवार) ने महाविकास आघाडीबरोबर काडीमोड घेऊन राष्ट्रवादी कॉंग्रेस (अजित पवार) गटाबरोबर घरोबा केला आहे. त्यामुळे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे दोन्ही गट एकत्र आले आहेत. भाजपला शह देण्यासाठी राष्ट्रवादी कॉंग्रेस (अजित पवार) आणि राष्ट्रवादी (शरद पवार) दोन्ही एकत्र आल्यामुळे निवडणूक चुरशीची होणार आहे.