PMC Elections : त्यांना हे सगळे नक्कीच समजले असेल; पण ते सांगणार कोणाला? अदानींवरून राज ठाकरे यांचा मुख्यमंत्र्यांवर पलटवार
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 13, 2026 19:21 IST2026-01-13T19:21:02+5:302026-01-13T19:21:55+5:30
त्यातील मेख मुख्यमंत्र्यांनी समजून घ्यावी. त्यांना हे सगळे नक्कीच समजले असेल; पण ते सांगणार कोणाला?, असा टोला मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी लगावला.

PMC Elections : त्यांना हे सगळे नक्कीच समजले असेल; पण ते सांगणार कोणाला? अदानींवरून राज ठाकरे यांचा मुख्यमंत्र्यांवर पलटवार
पुणे : उद्योगाला माझा कधीच विरोध नव्हता आणि नाही. पण, ज्या पद्धतीने सध्याची वाढ दाखवली जात आहे, त्यातील मेख मुख्यमंत्र्यांनी समजून घ्यावी. त्यांना हे सगळे नक्कीच समजले असेल; पण ते सांगणार कोणाला?, असा टोला मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी लगावला.
मुंबईतील सभेत राज ठाकरे यांनी अदानी यांच्या उद्योगांबाबत माहिती उघड केल्यावर फडणवीस यांनी राज ठाकरे आणि गौतम अदानी यांच्या भेटीचा फोटो दाखवला होती. त्यावर ठाकरे यांनी मंगळवारी (ता. १३) पुण्यात पत्रकार परिषदेत उत्तर दिले. ते म्हणाले, देशातील महत्त्वाच्या क्षेत्रांमध्ये एकाच माणसाची मक्तेदारी निर्माण होत असेल, तर तो माणूस भविष्यात देशाला वेठीस धरू शकतो. इंडिगो एअरलाइन्समुळे प्रवाशांचे जे हाल झाले, त्यावरून मक्तेदारीचा धोका लक्षात येतो. माझा विरोध उद्योगांना किंवा विकासाला नसून अदानी उद्योग समूहाद्वारे केंद्र सरकारच्या मदतीने ज्या पद्धतीने दुसऱ्यांचे उद्योग काबीज केले जात आहेत, त्या प्रक्रियेला आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी वाढ होत आहे, यापेक्षा ती कशी होतेय, हे समजून घेणे अधिक गरजेचे आहे.
टाटा, बिर्ला किंवा अंबानींसारख्या अनेक उद्योग समूहांनी शून्यातून विश्व उभे केले आहे. त्यांना इथपर्यंत पोहचायला ५० ते १०० वर्षे लागली. मात्र, अदानी केवळ १० वर्षांत इतके मोठे कसे झाले? सिमेंट, स्टील, बंदरे, विमानतळ आणि वीज या सर्व क्षेत्रांत एकाच माणसाची मक्तेदारी निर्माण होणे धोकादायक आहे. अदानी यांनी स्वतः विमानतळ बांधले नाही, तर चालवायला घेतलेली आहेत. ज्यांचे बंदरे होते, त्यांना ‘गनपॉइंट’वर आणून ती विकत घेतली गेल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला.
सिमेंट व्यवसायात अदानी कधीच नव्हते, तरीही ते अल्पावधीत देशात दुसऱ्या क्रमांकावर कसे पोहचतात, हे अनाकलनीय आहे. जेव्हा एखादा उद्योगसमूह केंद्र सरकारच्या मदतीने सर्वकाही ताब्यात घेतो, तेव्हा स्पर्धा संपते, असेही ते म्हणाले.