PMC Elections : दोन्ही राष्ट्रवादी आघाडीच्या निर्णयाने अनेकांचे भाजपातील प्रवेश थांबले
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 26, 2025 12:48 IST2025-12-26T12:47:32+5:302025-12-26T12:48:30+5:30
राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडून अजित पवार हे सरकारमध्ये सहभागी झाले. त्यामुळे राष्ट्रवादी (शरद पवार) आणि राष्ट्रवादी (अजित पवार) तयार झाले आहेत.

PMC Elections : दोन्ही राष्ट्रवादी आघाडीच्या निर्णयाने अनेकांचे भाजपातील प्रवेश थांबले
पुणे : महापालिका निवडणुकीत राष्ट्रवादी (अजित पवार) आणि राष्ट्रवादी (शरद पवार) यांची आघाडी होणार आहे. त्यामुळे राष्ट्रवादी (अजित पवार) पक्षातील अनेकांचे भाजपमध्ये होणारे प्रवेश थांबले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडून अजित पवार हे सरकारमध्ये सहभागी झाले. त्यामुळे राष्ट्रवादी (शरद पवार) आणि राष्ट्रवादी (अजित पवार) तयार झाले आहेत.
गेल्या वर्षी झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीत महायुती विरुद्ध महाविकास आघाडी, अशी निवडणूक झाली. त्यामध्ये महायुतीने बाजी मारली आणि देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले, तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार हे सत्तेत बसले. पुणे महापालिका निवडणुकीत भाजप आणि राष्ट्रवादी (अजित पवार) हे समोरासमोर येणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले आहे. महायुतीतील घटक पक्ष असलेल्या राष्ट्रवादीला (अजित पवार) पुणे महापालिका निवडणुकीत एकटे पाडले आहे.
दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या काही माजी नगरसेवकांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. त्यामुळे दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस वेगवेगळ्या लढल्यास भाजपलाच फायदा होण्याची शक्यता अधिक आहे. दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र आल्यास ते भाजपला काही प्रमाणात का होईना रोखणे शक्य होणार आहे. त्यादृष्टीने राष्ट्रवादीने (अजित पवार) पावले टाकत आहे. त्यामुळे दोन्ही राष्ट्रवादी आघाडीच्या निर्णयाने राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षातील अनेकांचे भाजपमधील प्रवेश थांबले आहेत.