PMC Elections 2026: राज्यातील महायुतीच्या प्रयाेगाने पुण्यात शिंदेसेनेला बळ...!
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 24, 2025 15:24 IST2025-12-24T15:21:35+5:302025-12-24T15:24:45+5:30
सत्तेत असल्याची ताकद वापरून शिंदे यांनी शिंदेसेना पक्ष वाढीचा सपाटा लावला आणि त्यांना पुण्यात अधिक बळ मिळताना दिसत आहे.

PMC Elections 2026: राज्यातील महायुतीच्या प्रयाेगाने पुण्यात शिंदेसेनेला बळ...!
पुणे : राज्यात महायुतीचे राज्य स्थापन झाले आणि सर्वच राजकीय समीकरणे बदलली. याचा परिणाम स्थानिक राजकारणावर झालेला दिसत आहे. विशेष म्हणजे, विविध कारणांनी तारीख पे तारीख पुढे ढकललेल्या महापालिका निवडणुकीचा बिगुल वाजला आणि स्थानिक राजकारणाने वेग घेतला. यात राज्यातील राजकीय समीकरणांचा परिणाम झाला नसता तरच नवल. याच महायुतीचा फायदा घेत ठाणे जिल्ह्यापुरते मर्यादित समजले जाणारे एकनाथ शिंदे पुण्याच्या राजकारणातही स्वत:चे वेगळे ठाण मांडताना दिसत आहेत. सत्तेत असल्याची ताकद वापरून शिंदे यांनी शिंदेसेना पक्ष वाढीचा सपाटा लावला आणि त्यांना पुण्यात अधिक बळ मिळताना दिसत आहे.
पुणे शहरात आजराेजी मुख्य लढत भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस अशी हाेणार असल्याचे चित्र दिसत आहे; पण यातून निर्माण हाेणाऱ्या पाेकळीचा अचूक लाभ शिंदेसेना घेईल, अशी शक्यता तज्ज्ञ मंडळी व्यक्त करीत आहेत. या निवडणुकीत खासकरून पुण्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजित पवार आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे या तिघाडी सरकारच्या तिनही नेतृत्वाची कस येथे लागणार आहे.
मिशन पुणेच्या माध्यमातून शिंदेसेनेने उद्धवसेनेतील नाराज नेते आणि काँग्रेसच्या नेतृत्वातून बाहेर पडणारे नेते शिंदे यांच्या शिंदेसेनेत प्रवेश करतील, असा प्रयत्न करीत आहेत. यातून शिंदेसेनेचे बळ वाढणार आहे. पक्षफुटीपासूनच एकनाथ शिंदे यांच्यासाेबत एकनिष्ठ राहिलेले पुणे शहराध्यक्ष प्रमाेद नाना भानगिरे आणि काॅंग्रेसला रामराम करून शिंदेसेनेत दाखल झालेले माजी आमदार रवींद्र धंगेकर यांनी शिंदेसेना पक्षाला बळ देण्यासाठी आक्रमक पवित्रा घेतल्याचे दिसत आहे.
त्यातच ऐन महापालिका निवडणुकांच्या तोंडावर, अवघ्या काही दिवसांपूर्वीच माजी उपमहापाैर आबा बागुल यांनी शिंदेसेनेचा झेंडा हाती घेतल्याने पक्ष बळकट हाेण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. यामुळे शिंदेसेना पुण्यातील राजकीय चित्र बदलेल, अशी शक्यता व्यक्त केली जाऊ लागली आहे. यातच शिंदेसेनेने महापालिका निवडणुकीसाठी मेगा प्लॅन आखला असल्याचे बाेलले जात आहे. असे असले, तरी त्यांना प्रमुख लढत विरोधकांसोबतच सत्ताधारी पक्षातील मित्रपक्षांसोबत करावी लागणार आहे. त्यामुळे निवडणुकांतील गणिते जुळवून आणण्यासाठी कट्टर हिंदुत्त्ववादी संघटनांशीही युती केली आहे. पतित पावन संघटना आणि शिंदेसेनेची युती वेगळे गणित मांडणार आहे.