PMC Elections: मुलाखती संपल्या, आता इच्छुकांच्या नजरा उमेदवारीकडे; भाजप-राष्ट्रवादीच्या इच्छुकांना इनकमिंगचे टेन्शन
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 23, 2025 12:09 IST2025-12-23T12:08:11+5:302025-12-23T12:09:13+5:30
भाजप आणि राष्ट्रवादीमधील निष्ठावंतांना आयत्या वेळच्या पक्षातील इनकमिंगचे टेन्शन सतावत आहे.

PMC Elections: मुलाखती संपल्या, आता इच्छुकांच्या नजरा उमेदवारीकडे; भाजप-राष्ट्रवादीच्या इच्छुकांना इनकमिंगचे टेन्शन
- हिरा सरवदे
पुणे : महापालिका निवडणुकीसाठी महायुती आणि महाविकास आघाडीसह प्रमुख राजकीय पक्षांनी आपल्या इच्छुकांच्या मुलाखती घेतल्या आहेत. आता उमेदवारी अर्ज भरण्यासाठी जेमतेम आठवडा उरला असल्याने सर्वपक्षीय इच्छुकांच्या नजरा उमेदवारी जाहीर होण्याकडे लागल्या आहेत. दुसरीकडे, राज्य आणि केंद्रात सत्तेत असलेल्या भाजपचा रस्ता अनेकांनी धरला आहे, तर भाजपमधील नाराजांना गळ घालण्याचा प्रयत्न राष्ट्रवादीकडून सुरू आहे, त्यामुळे भाजप आणि राष्ट्रवादीमधील निष्ठावंतांना आयत्या वेळच्या पक्षातील इनकमिंगचे टेन्शन सतावत आहे.
मागील चार वर्षांपासून महापालिकेची निवडणूकच झालेली नाही. त्यामुळे महापालिकेत नगरसेवक म्हणून निवडून जाण्याची मनोकामना ठेवून जोरदार तयारी करणाऱ्यांची संख्या वाढली आहे. राष्ट्रवादी आणि शिवसेना या दोन राजकीय पक्षांमध्ये उभी फूट पडल्याने वेगवेगळे पक्ष निर्माण झाल्याने जास्तीत जास्त इच्छुकांना निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची संधी मिळणार आहे. शहरात दोन नंबरची ताकद असलेल्या अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला सोबत न घेण्याची भूमिका जाहीर करणाऱ्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला मात्र सोबत घेतले आहे. त्यामुळे राज्याच्या सत्तेत मांडीला मांडी लावून बसलेल्या या तिन्ही पक्षांत महापालिका निवडणुकीत मात्र भाजप-शिंदेंसेना विरुद्ध राष्ट्रवादी अजित पवार गट समोरासमोर उभे ठाकणार आहेत.
दुसरीकडे काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष आणि उद्धवसेना हे पक्ष महाविकास आघाडीच्या माध्यमातून महापालिका निवडणुकीला सामोरे जाणार आहेत. महाविकास आघाडीमध्ये मनसेचा समावेश करण्यावरून शिवसेना व काँग्रेसमध्ये मतभेद आहेत. त्यामुळे महाविकास आघाडीत हा तिढा निर्माण झाला आहे. भाजपने अजित पवारांना दूर केल्यामुळे ते आणि शरद पवार यांचा पक्ष आघाडी करणार असल्याच्याही वावड्या उठत आहेत.
या सर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवर भाजप व अजित पवारांची राष्ट्रवादी यांच्यासह शहरातील सर्वच प्रमुख राजकीय पक्षांनी आपल्या इच्छुकांच्या मुलाखतींचा कार्यक्रम पूर्ण केला आहे. भाजपकडून तीन दिवसांमध्ये तब्बल २३५६ इच्छुकांच्या मुलाखती घेण्यात आल्या, तर अजित पवार यांनी एका दिवसात तब्बल ७११ इच्छुकांच्या मुलाखती स्वतः बारामतीत घेतल्या. सर्वांत कमी म्हणजे २५२ मुलाखती शरद पवार यांच्या राष्ट्रवादीच्या इच्छुकांच्या झाल्या आहेत. काँग्रेस, शिवसेनेचे दोन्ही गट आणि मनसेनेही इच्छुकांच्या मुलाखती घेतल्या आहेत. त्यामुळे शहरातील जवळपास सर्वच प्रमुख राजकीय पक्षांच्या मुलाखती संपलेल्या आहेत. आता महापालिका निवडणुकीचा अर्ज भरण्यासाठी काही दिवसच शिल्लक राहिल्याने मुलाखती दिलेल्या सर्व पक्षांच्या सर्व इच्छुकांच्या नजरा उमेदवारी याद्या जाहीर होण्याकडे लागल्या आहेत.
भाजप-राष्ट्रवादीच्या इच्छुकांना इनकमिंगचे टेन्शन
महायुतीच्या समन्वय समितीच्या बैठकीमध्ये महायुतीतील मित्र पक्षांचे इच्छुक किंवा महत्त्वाचे पदाधिकारी घ्यायचे नाहीत, असे ठरले असतानाही भाजपने राष्ट्रवादीच्या अनेकांना प्रवेश दिले आहेत. या प्रवेशामुळे पक्षातील निष्ठावंत नाराज होऊन आपल्याकडे येतील, अशी आशा अजित पवारांच्या राष्ट्रवादीला आहे. भाजपमध्ये काही माजी नगरसेवकांचे प्रवेश झाले आहेत. पक्ष प्रवेशाची दुसरी फेरी काही दिवसात होणार आहे. या पार्श्वभूमीवर भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या इच्छुकांना इनकमिंगचे टेन्शन आहे. मागील अनेक वर्षांपासून ज्याच्याशी संघर्ष केला, त्याचा प्रचार करण्याची वेळ आपल्यावर येणार नाही ना, हा विचार त्यांना सतावत आहे.
राजकीय पक्ष व घेतलेल्या मुलाखती -
भाजप - २३५६
राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) - ७११
काँग्रेस - ३५८
राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) - २५२
उद्धवसेना - ३३६
शिंदेसेना - ३२५
मनसे - ४९२