PMC Elections : भाजप उमेदवारांची पहिली यादी शुक्रवारी ? इच्छुकांचे लागले लक्ष
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 23, 2025 13:35 IST2025-12-23T13:33:09+5:302025-12-23T13:35:30+5:30
मागील निवडणुकीत ज्या जागा भाजपने जिंकल्या; त्या प्रभागातील उमेदवारांची घोषणा ..!

PMC Elections : भाजप उमेदवारांची पहिली यादी शुक्रवारी ? इच्छुकांचे लागले लक्ष
पुणे : महापालिका निवडणुकांसाठी भाजपमध्ये सर्वाधिक इच्छुकांची गर्दी असून अडीच हजार इच्छुकांनी पक्षाकडे मुलाखती दिल्या आहेत. आता उमेदवारी अर्ज भरण्यास प्रारंभ झाल्याने काही दिवसांतच उमेदवारांची नावे जाहीर होणार आहेत. त्यानुसार भाजप उमेदवारांची पहिली यादी शुक्रवारी (२६ डिसेंबर) रोजी जाहीर होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
राज्यात आणि केंद्रात भाजपची सत्ता असल्याने सर्वच प्रकारच्या निवडणुकांमध्ये भाजपला घवघवीत यश मिळत आहे. त्यातच महापालिका निवडणुकीसाठी भाजपला फायदेशीर ठरणारी चार सदस्यीय प्रभाग पद्धती अवलंबण्यात आली आहे. या सर्व घडामोडींमुळे भाजपकडून महापालिकेची निवडणूक लढल्यास आपल्या पदरात नगरसेवक पद पडू शकते, हा विश्वास असल्याने सर्वच राजकीय पक्षांचे नेते व इच्छुकांचा ओढा भाजपकडे आहे. त्यामुळे ४१ प्रभागातील १६५ जागांसाठी भाजपकडे तब्बल अडीच हजार इच्छुकांनी मुलाखती दिल्या आहेत.
दुसरीकडे भाजप आणि शिंदेंची शिवसेना एकत्र निवडणूक लढणार असल्याने दोन्ही पक्षांच्या नेत्यांच्या जोरबैठका सुरू आहेत. भाजपने शिवसेनेला दहा जागा सोडण्यास तयार आहेत, तर शिवसेनेची मागणी ३० ते ४० जागांची असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. त्यामुळे युती होणार की दोन्ही पक्ष स्वतंत्र लढणार हे स्पष्ट होण्यास काही दिवसांचा अवधी जाणार आहे. मात्र, उमेदवारांची पहिली यादी भाजप शुक्रवारी (२६ डिसेंबर) जाहीर करणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. या यादीमध्ये मागील निवडणुकीमध्ये ज्या जागा भाजपने जिंकल्या होत्या त्या प्रभागातील उमेदवारांची घोषणा केली जाणार आहे.