PMC Elections : भाजप-सेना युतीची यादी आज जाहीर होणार; केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांची माहिती
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 28, 2025 12:15 IST2025-12-28T12:11:32+5:302025-12-28T12:15:13+5:30
- शिंदेसेनेने २५ जागांची मागणी केली आहे, ती पूर्ण होईल का, याबाबत मात्र यादी जाहीर झाल्यानंतर कळेल

PMC Elections : भाजप-सेना युतीची यादी आज जाहीर होणार; केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांची माहिती
पुणे : महापालिका निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्यासाठी केवळ दोन दिवस शिल्लक असल्याने इच्छुकांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर भाजप, शिंदेसेना व रिपाइंमधील युतीच्या उमेदवारांची यादी रविवारी सायंकाळपर्यंत जाहीर होईल, अशी माहिती केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी दिली. काही जागांवर एकमत झाल्याचे सांगून शिंदेसेनेला जागा कमी मिळत असल्याच्या कारणावरून त्यांच्यात नाराजी नाही, कोणताही बेबनाव नाही, अशी स्पष्टोक्तीही त्यांनी या वेळी दिली. मात्र, दोन्ही पक्षांमध्ये जागा वाटपावरून ओढाताण सुरू असल्याचे बोलले जात आहे.
भारतीय जनता पक्षामध्ये अनेक इच्छुक निवडणूक लढवण्यासाठी तयार असतानाच राष्ट्रवादी अजित पवार, शरद पवार, उद्धवसेना तसेच अन्य पक्षांमधूनही नेत्यांचे पक्षप्रवेश सुरूच आहेत. त्यामुळे इच्छुकांची यादी लांबत चालली आहे. पक्षप्रवेश देणाऱ्यांना नेमकी काय आश्वासन दिले, याची माहिती गुलदस्त्यात ठेवली असली तरी त्यातील अनेकांना उमेदवारी द्यावी लागेल, हे उघड सत्य आहे. परिणामी मूळच्या भाजपमधील कार्यकर्त्यांना उमेदवारीबाबत साशंकता निर्माण झाली आहे. इच्छुकांमध्ये मोठी नाराजी दिसून येत आहे. मात्र, ही नाराजी उघडपणे कुणीही व्यक्त करत नसल्याचेही चित्र आहे.
उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी दोन दिवस शिल्लक राहिले असून, भाजपमध्ये इनकमिंग सुरूच आहे. त्यासह शिंदेसेना व रिपाइंसोबतची बोलणी अजूनही सुरूच असल्याने यादी रविवारी सायंकाळपर्यंत जाहीर होण्याची शक्यता आहे. याबाबत भाजपचे पुणे महापालिका प्रभारी केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी ही यादी करण्याचे काम अंतिम टप्प्यात आल्याचे स्पष्ट केले आहे. रविवार सायंकाळपर्यंत यादी जाहीर झालेली असेल, असेही त्यांनी स्पष्ट केले. नव्याने पक्षात आलेल्यांना उमेदवारी देणार का, याबाबत विचारले असता यादी जाहीर झाल्यानंतर ते कळेलच, असे सांगून त्यांनी वेळ मारून नेण्याचा प्रयत्न केला.
तसेच शिंदेसेनेने २५ जागांची मागणी केली आहे, ती पूर्ण होईल का, याबाबत मात्र यादी जाहीर झाल्यानंतर कळेल, असेही त्यांनी स्पष्ट केले. या जागांबाबत चर्चा सुरू असून लवकरच ती पूर्ण होईल, असेही ते म्हणाले. जागावाटपावरून शिंदेसेनेचे नेते नाराज असल्याचे दिसून येत आहे. त्यांनी २५ जागांची मागणी केली असताना भाजपने १५ जागांवर बोळवण केल्याने अनेक कार्यकर्त्यांनी विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांच्या घरासमोर आंदोलन केले होते. तर शुक्रवारी गोऱ्हे, नाना भानगिरे व अन्य नेत्यांमध्ये झालेल्या चर्चेतही खडाजंगी झाल्याने भानगिरे यांनी तडकाफडकीने बैठकीतून काढता पाय घेतला. यावरून जागा वाटपासंदर्भात शिंदेसेनेतही एकमत नसल्याचे दिसून येत आहे. याबाबत मोहोळ यांनी जागा वाटपावरून दोन पक्षांमध्ये थोडीफार घासाघीस आहे. मात्र, त्यातून तोडगा निघेल, असा विश्वास व्यक्त केला. भाजप आणि शिवसेनेची युती ही केवळ पुणे महापालिकेतच नाही तर राज्यातील सर्व महापालिकांसाठी झाली आहे. नागपूरमध्ये भाजपने प्रथमच शिवसेनेला बराेबर घेतले आहे. त्यामुळे पुण्यातही ही युती झालेली दिसेल, असे माेहाेळ म्हणाले.