PMC Elections : भाजपचे इच्छुक उमेदवार वाऱ्यावर; मुलाखती नव्हे तर थट्टा केल्याचा संताप
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 30, 2025 16:45 IST2025-12-30T16:44:46+5:302025-12-30T16:45:52+5:30
सोशल मीडियावर या मुलाखती घेण्याचे फोटो प्रसिद्ध करून शहरातही भाजप हाच नंबर एकचा पक्ष असल्याचे वातावरण केले होते.

PMC Elections : भाजपचे इच्छुक उमेदवार वाऱ्यावर; मुलाखती नव्हे तर थट्टा केल्याचा संताप
धनकवडी : भाजपने इच्छुकांचे अर्ज स्वीकारून मुलाखती घेण्याचा केवळ फार्स केला असून आयाराम-गयारामांबरोबरच ऐनवेळी अनपेक्षितपणे नेत्यांची मुलं, नातेवाईकांना उमेदवारी दिली जाणार असल्याचे कळताच प्रामाणिक कार्यकर्त्यांमध्ये असंतोष उफाळला आहे.
राज्यात महानगरपालिका निवडणुकांचे बिगुल वाजले असून, राजकीय वातावरण चांगलेच गरम झाल्याचं पाहायला मिळत आहे. सध्या भाजपमध्ये जोरदार इनकमिंग सुरू असल्याने निष्ठावंत कार्यकर्ते प्रचंड नाराज आहेत, मात्र मनात असंतोष असतानाही व्यक्त होता येत नाही, अशी खंतही काही कार्यकर्त्यांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केली.
दरम्यान पार्टीने प्रत्येक प्रभागातील इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागविले. त्याचा बोभाटा करून प्रसिद्धी मिळवली. त्याचवेळी मुलाखती पण घेण्यात आल्या. मोठ्या संख्येने इच्छुकांनी उमेदवारीसाठी अर्ज केले. या मुलाखती वेळी आलेल्या कटू अनुभवाची चर्चा शहरभर झाली. भारतीय जनता पार्टी हा देशातील नंबर एकचा पक्ष आहे. त्यामुळे बहुसंख्येने अर्ज येणारच, असे पदाधिकारी माध्यमांसमोर वारंवार सांगून जणू इच्छुक उमेदवारांनाच सूचक इशारा देत होते. सोशल मीडियावर या मुलाखती घेण्याचे फोटो प्रसिद्ध करून शहरातही भाजप हाच नंबर एकचा पक्ष असल्याचे वातावरण केले होते.
एकूणच शहर पदाधिकाऱ्यांनी अर्ज मागवणे व मुलाखती घेण्याचा केवळ फार्स करून पक्षाच्या निष्ठावंतांची थट्टा केल्याचा संताप इच्छुकांकडून व्यक्त होत आहे. स्वतःला पार्टी विथ डिफरन्स म्हणणाऱ्या पक्षाने काँग्रेसच्याही पुढे एक पाऊल टाकल्याची उद्विग्नता पक्षाच्या इच्छुकांकडून व्यक्त होत आहे.
बंडखोरीची भीती असल्याने यादी जाहीर नाही
निव्वळ बंडखोरी होईल, या भीतीमुळे उमेदवारी अर्ज भरण्यास केवळ दोन दिवस उरले असतानाही शहर भारतीय जनता पक्षाच्या वतीने अधिकृत यादी प्रसिद्ध केलेली नाही. त्याचवेळी काही संभाव्य उमेदवारांची नावे बाहेर पडत आहेत. त्यामध्ये मोठ्या नेत्यांच्या मुलांना व नातेवाईकांना संधी देण्यात आल्याची चर्चा आहे.