PMC Elections : अदानी बारामतीत, मंचावर बसलेल्या साहेब अन् दादांची चर्चा..! एकत्र येण्याच्या चर्चांना पुन्हा बळ
By प्रीती फुलबांधे | Updated: December 28, 2025 19:10 IST2025-12-28T19:09:29+5:302025-12-28T19:10:13+5:30
- कार्यक्रमादरम्यान व्यासपीठावर शरद पवार आणि अजित पवार यांच्यात झालेल्या चर्चेचा एक फोटो सध्या चर्चेचा विषय ठरला आहे. दोघांमध्ये नेमक्या कोणत्या विषयावर चर्चा झाली,

PMC Elections : अदानी बारामतीत, मंचावर बसलेल्या साहेब अन् दादांची चर्चा..! एकत्र येण्याच्या चर्चांना पुन्हा बळ
पुणे - राज्यभरात आगामी महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय हालचालींना वेग आला असून, अनेक पक्षांमध्ये बेरीज-वजाबाकीची समीकरणे पाहायला मिळत आहेत. पुण्यात पवार कुटुंबीय पुन्हा एकत्र येणार असल्याच्या चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरू होत्या. मात्र राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) या दोन्ही गटांमध्ये जागावाटप आणि निवडणूक चिन्हावरून मतभेद झाल्याने ही चर्चा फिस्कटल्याची माहिती राजकीय वर्तुळात चर्चिली जात आहे.
अशातच आज बारामती येथील विद्या प्रतिष्ठानमध्ये उभारण्यात आलेल्या देशातील पहिल्या जागतिक ‘एआय’ सेंटरचे उद्घाटन पार पडले. या कार्यक्रमासाठी उद्योगपती गौतम अदानी हे त्यांच्या पत्नी डॉ. प्रीती अदानी यांच्यासह उपस्थित होते. या निमित्ताने पवार कुटुंबीय अनेक दिवसांनंतर एकाच व्यासपीठावर एकत्र आलेले पाहायला मिळाले.
या कार्यक्रमात व्यासपीठावर ज्येष्ठ नेते शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार सुप्रिया सुळे, सुनेत्रा पवार, कृषी विकास प्रतिष्ठानचे चेअरमन राजेंद्र पवार, आमदार रोहित पवार आणि युगेंद्र पवार हे सर्व उपस्थित होते. पवार कुटुंबातील सर्व प्रमुख नेत्यांची एकत्र उपस्थिती लक्षवेधी ठरली.
दरम्यान, कार्यक्रमादरम्यान व्यासपीठावर शरद पवार आणि अजित पवार यांच्यात झालेल्या चर्चेचा एक फोटो सध्या चर्चेचा विषय ठरला आहे. दोघांमध्ये नेमक्या कोणत्या विषयावर चर्चा झाली, याबाबत राजकीय वर्तुळात तर्कवितर्क लावले जात आहेत. या फोटोमुळे पुन्हा एकदा पवार कुटुंबीय आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन्ही गट भविष्यात एकत्र येतील का ? याबाबत चर्चांना उधाण आले आहे.
पवार कुटुंबातील मनमोकळ्या संवादाचे दर्शन -
बारामती येथील एआय सेंटरच्या कार्यक्रमात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी खास शैलीत भाषणाची सुरुवात केली, ज्याने बारामतीकरांना हसवून टाकले. यावेळी उपमुख्यमंत्री पवार यांनी बारामतीच्या दोन्ही खासदार सुप्रिया सुळे, सुनेत्रा पवार, आमदार रोहित पवार यांचा उल्लेख खास शैलीत केला. पवार यांच्या या खास शैलीतील भाषणामुळे बारामतीकरांमध्ये हास्याचे वातावरण निर्माण झाले. यानिमित्ताने पवार कुटुंबातील मनमोकळ्या संवादाचे दर्शन घडले.