PMC Elections : ढोले-पाटील रोड क्षेत्रीय कार्यालयात ए बी फॉर्म कोणाला शेवटपर्यंत सस्पेन्स, अनेकांनी ऐनवेळी पक्ष बदलले
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 31, 2025 16:24 IST2025-12-31T16:23:31+5:302025-12-31T16:24:14+5:30
पक्षाच्या अधिकृत उमेदवारीसाठी आवश्यक असणाऱ्या ए बी फॉर्मबाबत शेवटपर्यंत शाश्वती नसल्याने ऐनवेळी अनेक उमेदवारांनी पक्ष बदलत आपली उमेदवारी भरल्याचे दिसून आले.

PMC Elections : ढोले-पाटील रोड क्षेत्रीय कार्यालयात ए बी फॉर्म कोणाला शेवटपर्यंत सस्पेन्स, अनेकांनी ऐनवेळी पक्ष बदलले
लष्कर : उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी सर्वच उमेदवारांची अक्षरशः धांदल उडल्याचे पाहायला मिळाले. दरम्यान, ढोले-पाटील क्षेत्रीय कार्यालय परिसरातील रस्ते उमेदवार आणि कार्यकर्त्यांनी व्यापून गेले असल्याचे पाहायला मिळाले. पक्षाच्या अधिकृत उमेदवारीसाठी आवश्यक असणाऱ्या ए बी फॉर्मबाबत शेवटपर्यंत शाश्वती नसल्याने ऐनवेळी अनेक उमेदवारांनी पक्ष बदलत आपली उमेदवारी भरल्याचे दिसून आले.
ढोले-पाटील क्षेत्रीय कार्यालयांतर्गत येणारे प्रभाग क्रमांक १३, पुणे स्टेशन जय - जवाननगर व प्रभाग १४, कोरेगाव पार्क-मुंढवा ह्या प्रभागांतर्गत येणाऱ्या अनेक इच्छुक उमेदवारांची स्वत:ची उमेदवारी निश्चित करताना अक्षरशः धांदल उडाली. या दरम्यान क्षेत्रीय कार्यालयांतर्गत कुठलाही अनुसूचित प्रकार घडू नये यासाठी मोठा पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. अनेक इच्छुकांनी ऐनवेळेस उमेदवारी नाकारल्याने कार्यकर्त्यांनी मिळेल त्या पक्षाकडून ए बी फॉर्म मिळवत आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. अर्ज भरताना कार्यकर्त्यांनी मोठी घोषणाबाजी करीत शक्तिप्रदर्शन केल्याचे दिसून आले; तर अनेक एकमेकांचे विरोधक समोरासमोर आल्यावर एकमेकांशी हस्तांदोलन केल्याचे दिसून आले, तर काहींनी एकमेकांचा चेहराही न बघितल्याचे पाहायला मिळाले.
उमेदवारी अर्ज भरण्यासाठी शेवटचा एक तास शिल्लक असताना क्षेत्रीय कार्यालय आवारात मोठी गर्दी झाल्याचे पाहायला मिळाले. दरम्यान, तीन वाजता कार्यालयाचे मुख्य द्वार बंद होत असताना जवळपास ३० ते ३५ उमेदवार फॉर्म भरण्यासाठी आत होते. या दरम्यान बंदोबस्तासाठी असलेले पोलिस प्रत्येक घटनेवर लक्ष ठेवून होते. कार्यकर्ते गर्दी करीत असताना पोलिस कर्मचारी त्यांना समजावून पुढे पाठवत होते. या दरम्यान कुठल्याही वाहनांना या ठिकाणी प्रवेश नाकारण्यात आला होता. उमेदवार १०० मीटर अंतर चालताच सूचक आणि अनुमोदकासह गेटमध्ये प्रवेश देण्यात येत होता.
ऐनवेळी अनेकांनी बदलले पक्ष
राजकीय पक्षांकडून वर्षानुवर्ष काम करणारे कार्यकर्ते... पक्षाने यंदा त्यांना आश्वासन दिल्याने उमेदवारांनी जोरदार प्रचार सुरू केला होता; मात्र उमेदवारी अर्ज भरताना शेवटच्या क्षणापर्यंत थांबलेल्या कार्यकर्त्यांनाच ऐनवेळी उमेदवारी नाकारल्याने मोठा भ्रमनिरास झाल्याने ऐनवेळी मिळेल त्या पक्षाकडून उमेदवारी अर्ज दाखल केला.
....अन् राजकीय पक्षांनी साधला डाव
कार्यकर्त्यांना आश्वासन देत शेवटपर्यंत उमेदवारी अर्जाबाबत लागणारा ए बी फॉर्म त्यांना दिलाच नाही. पॅनलचे समीकरण जुळवत, ऐनवेळी कार्यकर्ते आणि इच्छुकांना धक्कातंत्राचा अवलंब करीत उमेदवारी जाहीर करीत डाव साधला.