PMC Election 2026: पुण्यात ७४३ लोकांना निवडणूक लढवायची; काल दिवसभरात तब्बल ६९४ उमेदवारी अर्ज दाखल
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 30, 2025 09:54 IST2025-12-30T09:53:58+5:302025-12-30T09:54:34+5:30
Pune PMC Election 2026: पुणे महापालिका निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्यासाठी मंगळवार शेवटचा दिवस असून मोठ्या प्रमाणात गर्दी होणार

PMC Election 2026: पुण्यात ७४३ लोकांना निवडणूक लढवायची; काल दिवसभरात तब्बल ६९४ उमेदवारी अर्ज दाखल
पुणे : पुणे महापालिकेच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्यासाठी मंगळवारी (दि. ३०) शेवटचा दिवस आहे. त्यामुळे सोमवारी उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी सर्व क्षेत्रीय कार्यालयामध्ये गर्दी झाली होती. आज सोमवारी दिवसभरात सुमारे विविध पक्षांच्या ६९४ उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत. त्यामुळे गेल्या सात दिवसांत उमेदवारी अर्ज दाखल करण्याची संख्या ७४३ झाली आहे.
पुणे महापालिकेची निवडणूक १५ डिसेंबर रोजी जाहीर हाेऊन आचारसंहिता लागली आहे. पुणे महापालिकेच्या ४१ प्रभागात १६५ जागा आहेत. या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्यासाठी २३ डिसेंबरपासून सुरुवात झाली आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी ३० डिसेंबरपर्यंत मुदत आहे. उमेदवारी अर्ज दुपारी तीन वाजेपर्यंत स्वीकारण्याची मुदत आहे. त्याच भाजप, काँग्रेस, राष्ट्रवादी (अजित पवार), राष्ट्रवादी (शरद पवार), शिंदेसेना, उद्धवसेना, मनसे या सर्व पक्षाची आघाडी आणि युतीचा घोळ रविवारपर्यंत कायम होता. सोमवारी सकाळी दोन्ही राष्ट्रवादीची आघाडी आणि उद्धवसेना व काँग्रेसची आघाडी झाली. पण, अद्यापही भाजप आणि शिंदेसेनेची युतीची घोषणा झालेली नाही. त्यामुळे आतापर्यंत सर्वच पक्षातील इच्छुक उमेदवारी यादीचे वाट बघत होते. पण, भाजपने उमेदवारी यादीला फाटा देत थेट उमेदवारी निश्चित झालेल्यांना एबी फार्म दिले. त्यातच काही पक्षांनी एबी फार्म दिले नसले तरी उमेदवारी अर्ज भरले आहेत. त्यामुळे सोमवारी उमेदवारी अर्ज भरण्यासाठी १५ क्षेत्रीय कार्यालयांमध्ये गर्दी झाली होती. दुपारी तीन वाजेपर्यंत निवडणूक कार्यालयाच्या गेटमध्ये आलेल्याचे उमेदवारी अर्ज स्वीकारावे लागतात. सर्व क्षेत्रीय कार्यालयमध्ये रात्री उशिरापर्यंत हे काम सुरू होते.
शेवटच्या दिवशी अर्ज भरण्यासाठी गर्दी होणार
पुणे महापालिका निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्यासाठी मंगळवार शेवटचा दिवस आहे. त्यामुळे मंगळवारी सर्व क्षेत्रीय कार्यालयामध्ये मोठ्या प्रमाणात उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी गर्दी होणार आहे.
क्षेत्रीय कार्यालय- उमेदवारी अर्ज दाखल संख्या
येरवडा कळस धानोरी कार्यालय –६९
नगर रोड -वडगाव शेरी कार्यालय – ८८
कोथरूड बावधन कार्यालय –२४
औंध बाणेर कार्यालय –२०
शिवाजीनगर घोले रोड कार्यालय –१४
ढोले पाटील रोड कार्यालय –४७
हडपसर मुंढवा कार्यालय –६३
वानवडी रामटेकडी कार्यालय –४२
बिबवेवाडी कार्यालय –७२
भवानी पेठ कार्यालय –५९
कसबा विश्रामबाग वाडा कार्यालय –३२
वारजे कर्वेनगर कार्यालय –४८
सिंहगड रोड कार्यालय –४०
धनकवडी सहकारनगर कार्यालय –५८
कोंढवा येवलेवाडी कार्यालय –१८
एकूण : ६९४