PMC Elections 2026: संवेदनशील मतदान केंद्र ९०६, २६ हजार कर्मचारी व ४१०० पोलिस तैनात
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 10, 2026 10:45 IST2026-01-10T10:43:08+5:302026-01-10T10:45:19+5:30
पुणे महापालिका निवडणुकीत सुमारे १२ हजार टपाली मतपत्रिकाकरिता मागणी नोंदविली असून त्या अनुषंगाने कार्यवाही सुरू आहे.

PMC Elections 2026: संवेदनशील मतदान केंद्र ९०६, २६ हजार कर्मचारी व ४१०० पोलिस तैनात
पुणे : पुणे महापालिका निवडणुकीसाठी ४ हजार ११ मतदान केंद्र आहेत. त्यात ९०६ संंवेदनशील मतदान केंद्र आहेत. या संवेदनशील मतदान केंद्रांवर सीसीटीव्ही कॅमेरा, पोलिसांचे जादा मन्युष्यबळ तैनात करून कडेकोट बंदोबस्त ठेवला जाणार आहे. या निवडणुकीच्या मतदान केंद्रासाठी २६ हजार कर्मचारी आणि ४ हजार १०० पोलिसांचा बंदोबस्त तैनात असणार आहे.
पुणे महापालिकेेचे आयुक्त तथा निवडणूक निर्णय अधिकारी नवल किशोर राम यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. अतिरिक्त आयुक्त ओमप्रकाश दिवटे, उपायुक्त प्रसाद काटकर, रवी पवार, तुषार बाबर आदी उपस्थित होते. पुणे महापालिका निवडणुकीसाठी एकूण नियुक्त क्षेत्रीय अधिकारी संख्या ४५४ आहे. १४ हजार ५०० मतदान यंत्र (बॅलेट युनिट), तर ५ हजार ५०० कंट्रोल युनिट आहेत. या निवडणुकीसाठी १७२ पथके स्थापन करण्यात आली आहेत.
पुणे महापालिका निवडणुकीत सुमारे १२ हजार टपाली मतपत्रिकाकरिता मागणी नोंदविली असून त्या अनुषंगाने कार्यवाही सुरू आहे. पुणे महापालिका निवडणुकीसाठी १४ हजार ५०० मतदान यंत्र (बॅलेट युनिट) आहेत. त्यापैकी काही मतदानयंत्रांमध्ये उमेदवारांच्या प्रतिनिधीसमोर मतपत्रिका सील करण्यास काही ठिकाणी सुरुवात झाली आहे. प्रत्येक प्रभागामध्ये महिला मतदान केंद्र आणि प्रत्येक प्रभागामध्ये आदर्श मतदान केंद्र प्रत्येकी दोन केंद्र असणार आहेत, असे आयुक्त नवल किशोर राम यांनी सांगितले.
मतमोजणीसाठी अकराशे कर्मचारी
पुणे महापालिकेेच्या निवडणुकीची मतमोजणी १६ जानेवारी रोजी होणार आहे. मतमोजणीसाठी १ हजार १०० कर्मचारी नेमले आहेत.
मतदानांच्या दिवशी ४५ रुग्णवाहिका
महापालिका निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालय येथे रुग्णवाहिकेसहित १५ वैद्यकीय पथक उपलब्ध करून देण्यात आले आहे. मतदानाच्या दिवशी पालिकेच्या १५ रुग्णवाहिका उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. १५ क्षेत्रीय कार्यालयाकडे बूथनिहाय स्टाफ, नर्स आणि आशा कार्यकर्त्यांची नेमणूक करण्यात आली आहे.
निवडणूक निर्णय अधिकारी १५
सहायक निवडणूक निर्णय अधिकारी ३५
आचारसंहिता पथके ६५
क्षेत्रीय अधिकारी ३३८
एकूण बस ८६०
सुमो /जीप २५०