PMC Elections 2026: महापालिका निवडणुकीसाठी मतदानयंत्राच्या सज्जतेची आयुक्तांनी केली पाहणी
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 6, 2026 12:36 IST2026-01-06T12:34:22+5:302026-01-06T12:36:12+5:30
यावेळी मतदान यंत्रांची पाहणी, स्ट्राँग रूमची पाहणी, मतमोजणी केंद्राची पाहणी तसेच निवडणूक कामकाजाचा सविस्तर आढावा घेण्यात आला.

PMC Elections 2026: महापालिका निवडणुकीसाठी मतदानयंत्राच्या सज्जतेची आयुक्तांनी केली पाहणी
पुणे :पुणे महापालिका निवडणुकीसाठी भवानी पेठ येथील सावित्रीबाई फुले प्रशाला येथे व कसबा पेठ क्षेत्रीय कार्यालय यांचे न्यू इंग्लिश स्कूल, टिळक रोड येथील मतदान प्रक्रियेसंदर्भात महत्त्वपूर्ण पाहणी महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांनी पाहणी केली.
महापालिका सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने भवानी पेठ येथील सावित्रीबाई फुले प्रशाला येथे आणि कसबा पेठ क्षेत्रीय कार्यालय यांचे न्यू इंग्लिश स्कूल, टिळक रोड येथील मतदान प्रक्रियेसंदर्भात महत्त्वपूर्ण पाहणी करण्यात आली. पालिकेचे आयुक्त नवल किशोर राम, अतिरिक्त महापालिका आयुक्त (विशेष) ओमप्रकाश दिवटे, भवानी पेठ क्षेत्रीय कार्यालयाचे निवडणूक निर्णय अधिकारी कल्याण पांढरे यांच्यासह निवडणूक उपायुक्त प्रसाद काटकर, अरविंद माळी, आशा राऊत, तिमया जागले, महाडिक हे उपस्थित होते.
यावेळी मतदान यंत्रांची पाहणी, स्ट्राँग रूमची पाहणी, मतमोजणी केंद्राची पाहणी तसेच निवडणूक कामकाजाचा सविस्तर आढावा घेण्यात आला. यामध्ये मतदान यंत्रांची सुरक्षितता, स्ट्राँग रूममधील संरक्षक व्यवस्था, सीसीटीव्ही निगराणी, अग्निशमन सुविधांची उपलब्धता तपासणी, तसेच मतमोजणी केंद्रातील आवश्यक सुविधांची पाहणी करण्यात आली. यावेळी मतदान यंत्रांची पाहणी करून तंत्रज्ञ यांच्याशी संवाद साधला.
विद्युत व्यवस्था सुरक्षित ठेवणे, स्ट्राँग रूम व मतमोजणी केंद्रांमध्ये आवश्यक सुरक्षा व्यवस्था उपलब्ध करणे, तसेच मतमोजणीची प्रक्रिया नियोजित वेळेत, पारदर्शक व सुरळीत पार पडेल यासाठी आवश्यक मनुष्यबळ, तांत्रिक सुविधा व नियंत्रण कक्षांची योग्य व्यवस्था करण्याबाबत नवल किशोर राम यांनी स्पष्ट सूचना दिल्या आहेत. निवडणूक प्रक्रिया शांततेत, निर्भय वातावरणात व नियमानुसार पार पडावी यासाठी सर्व संबंधित यंत्रणांमध्ये समन्वय ठेवण्याचे निर्देश देण्यात आले. भवानी पेठ व कसबा पेठ क्षेत्रीय कार्यालयामार्फत निवडणुकीसाठी केलेल्या तयारीचा आढावा घेत पुढील आवश्यक सुधारणा व कार्यवाहीबाबत मार्गदर्शन करण्यात आले.