PMC Elections 2026: 'देवेंद्र फडणवीस यांनी दिलेला शब्द पाळला नाही', अमोल बालवडकर अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करणार
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 30, 2025 13:21 IST2025-12-30T13:20:56+5:302025-12-30T13:21:20+5:30
PMC Elections 2026 भाजपने माझ्यसोबत दगा फटका केला असून ऐनवेळी मला उमेदवारी नाकारली आहे

PMC Elections 2026: 'देवेंद्र फडणवीस यांनी दिलेला शब्द पाळला नाही', अमोल बालवडकर अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करणार
पुणे: विधानसभेच्या रणधुमाळीत पुण्यात भाजपच्या वतीने कोथरूड विधानसभा मतदार संघातून चंद्रकांत पाटील यांच नाव चर्चेत होते. त्यावेळी माजी नगरसेवक अमोल बालवडकर यांनीसुद्धा भाजपकडून विधानसभा लढवण्याची इच्छा व्यक्त केली होती. त्यावरून भाजपमध्ये अंतर्गत वाद सुरु झाल्याचे समोर आले होते. अखेर चंद्रकांत पाटलांना उमेदवारी देऊन विधानसभा लढवण्यास तयार केले. त्यावेळी बालवडकर यांनी नाराजी व्यक्त केली होती. मी निवडणुकीसाठी कोथरूड मतदारसंघातून इच्छुक असून, पक्षाने जर मला उमेदवारी नाही दिली, तर मग मला माझ्या जनतेसाठी वेगळा निर्णय घ्यावा लागेल, असेही त्यांनी स्पष्ट केले होते.
भाजपने त्यांना महानगरपालिकेला संधी देण्याचा शब्द दिला होता. त्यानुसार त्यांनी माघार घेतली. कुठलेही कठोर पाऊल उचलले नाही. मात्र आज अखेर त्यांना भाजपकडून उमेदवारी न मिळाल्याने त्यांनी थेट राष्ट्रवादी अजित पवार पक्षात जाण्याचा निर्णय घेतला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शब्द दिला होता. तो शब्द पाळला गेला नसल्याचे सांगून त्यांनी हा निर्णय घेतला आहे.
बालवाडकर म्हणाले, विधानसभेला देवेंद्र फडणवीस यांनी शब्द दिल्याने माघार घेतली. एक लाखाच्या मताधिक्याने चंद्रकांत पाटलांना निवडून आणलं. त्यानंतर भाजपाने माझ्या सोबत दगा फटका केला. मला दोन दिवस अगोदर जरी सांगितलं असतं तरी मी ऐकलं असतं. मात्र ऐनवेळी मला उमेदवारी नाकारली. मी दादांच्या पक्षात जाण्याचा निर्णय घेतला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शब्द दिला होता. तो शब्द पाळला गेला नाही. यामध्ये भाजप पक्षाचे नुकसान झाल आहे माझं नाही. मी राष्ट्रवादीत जाणार आहे. याचं नुकसान माझ्यापेक्षा जास्त भाजपला होणार आहे. याचा फटका भाजपाला बसेल.