PMC Elections : टीव्ही, कपाट, रिक्षा अन् बॅट... ; महापालिका निवडणुकीत अपक्ष उमेदवारांसाठी १९१ चिन्हे
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 31, 2025 17:46 IST2025-12-31T17:46:09+5:302025-12-31T17:46:42+5:30
पुणे महापालिका निवडणुकीत राजकीय पक्षाच्या उमेदवारांना एबी अर्ज दिलेला आहे. त्यामुळे त्यांना पक्षाच्या चिन्हावर निवडणूक लढवावी लागते.

PMC Elections : टीव्ही, कपाट, रिक्षा अन् बॅट... ; महापालिका निवडणुकीत अपक्ष उमेदवारांसाठी १९१ चिन्हे
पुणे :पुणे महापालिका निवडणुकीसाठी भाजपसह अन्य पक्षांतील इच्छुकांना उमेदवारी मिळालेली नाही. त्यामुळे अनेकांनी बंडखोरी करत अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. राज्य निवडणूक आयोगाने अपक्ष उमेदवारांसाठी १९१ इतकी चिन्हे राखीव ठेवली आहेत.
पुणे महापालिका निवडणुकीत राजकीय पक्षाच्या उमेदवारांना एबी अर्ज दिलेला आहे. त्यामुळे त्यांना पक्षाच्या चिन्हावर निवडणूक लढवावी लागते. अपक्ष उमेदवारांना ऐनवेळी चिन्ह दिले जाते. त्यामुळे निवडणूक चिन्हे प्रत्येक मतदारांपर्यंत पोहोचविण्याचे आव्हान अपक्ष उमेदवारांपर्यंत असते.
चिन्ह वाटपाची प्रक्रिया ही आयोगाच्या नियम व मार्गदर्शक सूचनांनुसार पारदर्शक पद्धतीने करण्यात येते. मान्यताप्राप्त पक्षांना त्यांच्या राखीव चिन्हावरच उमेदवार उभे करता येतात. राष्ट्रीय स्तरावरील पाच, राज्यस्तरीय पाच आणि इतर राज्यांतील नऊ पक्षांची चिन्हे राखीव आहेत. त्यानंतर अपक्ष उमेदवारांसाठी १९१ मुक्त चिन्हे आहेत. त्यातून प्राधान्यक्रमाने चिन्हांची मागणी अर्जातच करावी लागते. अपक्ष उमेदवारांना तसेच मान्यता नसलेल्या राजकीय पक्षांच्या उमेदवारांना या मुक्त चिन्हांमधून चिन्हाची निवड करता येईल.
ही आहेत चिन्हे
टीव्ही, कपाट, रिक्षा, बॅट, लॅपटॉप, फुटबॉल, चावी, हेडफोन, कंगवा, टेबल, फळा, दुर्बीण आदी चिन्हांचा समावेश आहे. यासह सफरचंद, बिस्कीट, पाव, केक, ढोबळी मिरची, फ्लॉवर, नारळ, ऊस, आले, द्राक्ष, हिरवी मिरची, फणस, भेंडी, मका, भुईमूग, वाटाणे, पेर, अननस, कलिंगड, आक्रोड, जेवणाची थाळी अशा चिन्हांचाही राखीव चिन्हांत समावेश आहे.
३ जानेवारी रोजी होणार चिन्हांचे वाटप
पालिका निवडणुकीसाठी २ जानेवारी रोजी उमेदवारी अर्ज मागे घेता येणार आहे. त्यानंतर ३ जानेवारी रोजी अपक्षांना आणि उमेदवारांना ३ जानेवारी रोजी चिन्हांचे वाटप केले जाणार आहे.