PMC Election Results 2026: मानकरांचा २६ हजार मतांचा विक्रम; राज्यात सर्वाधिक मताधिक्याची नोंद
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 18, 2026 15:41 IST2026-01-18T15:40:26+5:302026-01-18T15:41:58+5:30
मानकर यांना मिळालेले हे मताधिक्य राज्यातील महापालिकांमध्ये सर्वाधिक ठरले आहे.

PMC Election Results 2026: मानकरांचा २६ हजार मतांचा विक्रम; राज्यात सर्वाधिक मताधिक्याची नोंद
- हिरा सरवदे
पुणे : महापालिका निवडणुकीमध्ये निवडून आलेल्या नगरसेवकांमध्ये सर्वाधिक २६ हजार ४९७ मताधिक्य भाजपचे प्रभाग २५ मधील भाजप उमेदवार राघवेंद्र (बाप्पू) मानकर यांना मिळाले आहे. तर सर्वात कमी म्हणजे केवळ ५५ मतांनी भाजपचेच प्रभाग १७ मधील उमेदवार खंडू लोंढे हे विजयी झाले आहेत. मानकर यांना मिळालेले हे मताधिक्य राज्यातील महापालिकांमध्ये सर्वाधिक ठरले आहे.
महापालिका निवडणुकीच्या प्रचारादरम्यान भाजप नेते आणि उपमुख्यमंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्यामध्ये आरोप प्रत्यारोपाच्या फैरी झडल्या. अजित पवार आणि शरद पवार एकत्र आल्याने भाजप आणि दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये चांगलीच चुरस निर्माण झाली होती. त्यामुळे १२० पेक्षा अधिक जागा जिंकण्याचे लक्ष ठेवलेला भाजप पक्ष ८० ते ९० जागा जिंकेल, तर दोन राष्ट्रवादी मिळून ५० ते ६० जागा जिंकतील असा अंदाज अनेक अभ्यासकांनी आणि कार्यकर्त्यांनी व्यक्त केला होता. मात्र, निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर भाजपने ठेवलेले उद्दिष्ट गाठत दोन्ही राष्ट्रवादींना आसमान दाखवल्याचे स्पष्ट झाले. या निवडणुकीत भाजपचे ११० उमेदवार विजयी झाले. तर दोन्ही राष्ट्रवादींना केवळ ३० जागांवर समाधान मानावे लागले.
विजयी झालेल्या भाजपच्या उमेदवारांचे मताधिक्य जास्त तर राष्ट्रवादीच्या विजयी उमेदवारांचे मताधिक्य कमी आहे. भाजपचे प्रभाग क्र. २५ मधील उमेदवार राघवेंद्र मानकर यांनी ७९.३४ टक्के मते घेत उद्धवसेनेचे समीर गायकवाड यांचा तब्बल २६ हजार ४९७ मतांनी पराभव केला आहे. त्या खालोखाल प्रभाग ४ मधील भाजपच्या उमेदवार रत्नमाला सातव यांना दोन नंबरचे मताधिक्य असून त्यांनी राष्ट्रवादीच्या वसुंधरा उबाळे यांचा २३ हजार १३६ मतांनी पराभव केला आहे. तसेच तीन नंबरचे मताधिक्य माजी खासदार गिरीश बापट यांच्या सून स्वरदा बापट यांना असून त्यांनी राष्ट्रवादीच्या अॅड. राधिका कुलकर्णी यांचा २२ हजार ६८१ मतांनी पराभव केला आहे.
याशिवाय सर्वात कमी मताने विजयी होण्याचा मानही भाजप उमेदवारालाच मिळाला आहे. प्रभाग १७ मधील भाजप उमेदवार खंडू लोंढे यांनी राष्ट्रवादीचे माजी नगरसेवक अशोक कांबळे यांच्या केवळ ५५ मतांनी पराभव केला आहे. त्यानंतर दोन नंबरचे कमी मताधिक्य प्रभाग २२ मधील भाजप उमेदवार विवेक यादव यांचे असून त्यांनी काँग्रेसचे अविनाश बागवे यांचा ६२ मतांनी पराभव केला आहे. तर राष्ट्रवादीचे प्रभाग २ मधील उमेदवार रवी ऊर्फ हर्षल टिंगरे यांनी भाजप उमेदवार सुधीर वाघमोडे यांचा १३८ मतांनी पराभव केला आहे.
-------------------
सर्वाधिक मतांनी विजय झालेले उमेदवार
१) राघवेंद्र (बाप्पू) मानकर (भाजप) - २६ हजार ४९७
२) रत्नमाला सातव (भाजप) - २३ हजार १३६
३) स्वरदा बापट (भाजप) - २२ हजार ६८१
-------------
सर्वात कमी मतदानांनी विजयी झालेले उमेदवार
१) खंडू लोंढे (भाजप) - ५५
२) विवेक यादव (भाजप) - ६२
३) रवी ऊर्फ हर्षल टिंगरे (राष्ट्रवादी) - १३८
--------------------