PMC Election Results 2026: सरासरी ५४ टक्के मतदान; पुणेकरांनी ८ वर्षांनी कोणाच्या हातात दिली महापालिका, निकालाची उत्सुकता
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 16, 2026 09:22 IST2026-01-16T09:21:22+5:302026-01-16T09:22:39+5:30
PMC Election Results 2026 पुणे महापालिका निवडणूक दोन्ही राष्ट्रवादी एकत्रितपणे लढवत आहेत. या निवडणुकीत भाजप आणि शिंदेसेनेची युती झाली नाही

PMC Election Results 2026: सरासरी ५४ टक्के मतदान; पुणेकरांनी ८ वर्षांनी कोणाच्या हातात दिली महापालिका, निकालाची उत्सुकता
पुणे : पुणे महापालिकेच्या ४१ प्रभागांतील १६५ जागांसाठी १ हजार १५३ उमेदवारांचे भवितव्य ईव्हीएम मशीनमध्ये बंद झाले. वादावादीचे किरकोळ अपवाद वगळता शांततेत मतदान पार पडले. या निवडणुकीत सरासरी ५४ टक्के मतदान झाले आहे. या निवडणुकीची मतमोजणी आज, शुक्रवारी (दि. १६) होणार असून, निकालाची उत्सुकता सर्वांना लागली आहे.
पुणे - पिंपरी चिंचवड महापालिका निकाल लेटेस्ट अपडेट पहा एका क्लीकवर...
पुणे महापालिका निवडणुकीच्या ४१ प्रभागांसाठी १६५ जागा आहेत. ४१ प्रभागांमध्ये ४ सदस्यीय ४० प्रभाग आहेत. प्रभाग क्रमांक ३८ हा पाच सदस्यीय आहे. या निवडणुकीत १६५ जागांसाठी १ हजार १५५ उमेदवार रिंगणात होते. त्यात २७७ अपक्ष उमेदवार आहेत. प्रभाग क्रमांक ३५ मधील भाजपच्या मंजूषा नागपुरे आणि श्रीकांत जगताप यांची बिनविरोध निवड झाली आहे. यामुळे आता १६३ जागांसाठी मतदान शांततेत पार पडले. पुणे पालिका निवडणूक दोन्ही राष्ट्रवादी एकत्रितपणे लढवत आहेत. या निवडणुकीत भाजप आणि शिंदेसेनेची युती झाली नाही. त्यामुळे भाजप आणि शिंदेसेनेचे उमेदवार एकमेकांच्या विरोधात उभे आहेत. काँग्रेस व उद्धवसेना-मनसे हे तिन्ही पक्ष एकत्रितपणे निवडणूक लढवत आहेत. या निवडणुकीसाठी ४ हजार ११ मतदान केंद्रे होती. सकाळी साडेसात वाजल्यापासून मतदानाला सुरुवात झाली. सोसायटी भागांसह अनेक मतदान केंद्रांवर सकाळच्या वेळी गर्दी होती, पण दुपारी १२ नंतर काही मतदान केंद्रांवरील गर्दी कमी झाली होती. दुपारी तीननंतर पुन्हा मतदान केंद्रांवर गर्दी वाढली.
दुबार मतदान रोखण्यात काही प्रमाणात यश
पुणे महापालिकेच्या निवडणुकीत दुबार मतदारांची नावे तब्बल ३ लाख ४४६ आहेत. दुबार मतदारांच्या यादीनुसार महापालिकेचेे कर्मचारी संबंधित मतदारांच्या घरी जाऊन तो मतदार इथे मतदान करणार असेल तर अर्ज भरून घेतले होते. त्या मतदाराचे नाव दुसऱ्या ठिकाणी असल्यास तेथे मतदान केले म्हणून शिक्का मारला गेला होता. त्यामुळे दुबार मतदान राेखण्यात काही प्रमाणात यश आले.
या कारणामुळे मतदानाचे प्रमाण कमी
पुणे महापालिका निवडणुकीत एकाच कुटुंबातील अनेकांचे मतदान वेगवेगळ्या प्रभागात गेले. त्यामुळे मतदारांना नावे शोधण्यासाठी मनस्ताप झाला. मतदार यादीतून काही नावे गायब होती. काही मतदान केंद्रांवर ज्येष्ठ नागरिकांसाठी सुविधा नव्हत्या. त्यामुळे मतदानाचे प्रमाण अपेक्षेपेक्षा कमी राहिले आहे.
सरासरी ५४ टक्के मतदान
पुणे महापालिकेच्या २००७ च्या निवडणुकीत ५२.७९ टक्के, २०१२ च्या निवडणुकीत ५०.९२ टक्के, तर २०१७ च्या निवडणुकीत ५५.६० टक्के मतदान झाले होते. या निवडणुकीत सरासरी ५४ टक्के मतदान झाले आहे. त्यामुळे २०१७च्या महापालिका निवडणुकीच्या तुलनेत मतदान १ टक्क्यांनी कमी झाले आहे. या निवडणुकीत घसरलेल्या टक्केवारीचा फायदा नेमका कुणाला होणार? यावर तर्कवितर्क लढविले जात आहेत.