PMC Election 2026: महिलांची सुरक्षितता, भुयारी मार्ग; पुण्यासाठी डॉ. नीलम गोऱ्हे यांनी मांडला 'शब्द शिवसेनेचा' वचननामा
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 10, 2026 14:58 IST2026-01-10T14:56:04+5:302026-01-10T14:58:15+5:30
PMC Election 2026 महिलांना बस प्रवास निम्म्या दरात उपलब्ध करून दिला जाईल, कौटुंबिक हिंसाचारापासून संरक्षणासाठी मोफत कायदा सल्ला केंद्रे तयार केले जातील

PMC Election 2026: महिलांची सुरक्षितता, भुयारी मार्ग; पुण्यासाठी डॉ. नीलम गोऱ्हे यांनी मांडला 'शब्द शिवसेनेचा' वचननामा
पुणे: पुणे हे केवळ सांस्कृतिक केंद्र नसून जागतिक स्तरावरील आयटी आणि उद्योगांचे केंद्र आहे. मात्र, वाढत्या शहरीकरणासोबत निर्माण झालेली वाहतूक कोंडी, प्रदूषण आणि पाणीटंचाई यांसारख्या समस्या सोडवण्यासाठी शिवसेना कटिबद्ध आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचा वारसा आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पुण्याच्या सर्वांगीण विकासाचा 'शब्द शिवसेनेचा' हा वचननामा प्रकाशित झाला असून, याबाबत विधानपरिषेदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी सविस्तर माहिती दिली.
डॉ. गोऱ्हे म्हणाल्या, 'पुणेकरांच्या दैनंदिन जीवनातील सर्वांत मोठा अडथळा ठरणाऱ्या वाहतूक कोंडीवर शिवसेनेने विशेष लक्ष केंद्रित केले आहे. पुणे विद्यापीठ रस्ता, कर्वे रोड आणि सिंहगड रोड यांसारख्या महत्त्वाच्या मार्गांवर भुयारी मार्ग (टनल रोड) उभारण्यात येतील. तसेच, सार्वजनिक वाहतूक पर्यावरणपूरक करण्यासाठी पीएमपीएलच्या ताफ्यात पूर्णपणे इलेक्ट्रिक बसेसचा समावेश करण्यात येईल आणि मेट्रोचे जाळे अधिक वेगाने विस्तारले जाईल. त्यासोबतच महिलांच्या सुरक्षिततेसाठी आणि स्वावलंबनासाठी वचननाम्यात महत्त्वपूर्ण घोषणा करण्यात आल्या आहेत. शहरात महिलांना बस प्रवास निम्म्या दरात उपलब्ध करून दिला जाईल. कौटुंबीक हिंसाचारापासून संरक्षणासाठी मोफत कायदा सल्ला केंद्रे आणि शहरात आधुनिक स्वच्छतागृहांची निर्मिती केली जाईल. तसेच पुण्याचे वैभव असणाऱ्या डोंगरदऱ्यांचे रक्षण करण्यासाठी डोंगरमाथा - डोंगरउतार बांधकामांवर बंदी घालण्याचा निर्धार डॉ. गोऱ्हे यांनी व्यक्त केला.