PMC Election 2026 : आम्ही काय केले? विचारणाऱ्यांनी आरसा पाहावा;मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची अजित पवारांवर टीका
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 6, 2026 15:26 IST2026-01-06T15:25:27+5:302026-01-06T15:26:43+5:30
- चर्चा जेवढी मागे जाईल तेवढ्या अडचणी निर्माण होतील, असा सूचक इशारा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नाव न घेता उपमुख्यमंत्री व पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांना दिला.

PMC Election 2026 : आम्ही काय केले? विचारणाऱ्यांनी आरसा पाहावा;मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची अजित पवारांवर टीका
पुणे : अनेकजण महापालिकेत सत्ता असताना आम्ही काय केले, ते विचारत आहेत. त्यांनी आम्हाला विचारण्यापूर्वी आरसा पाहावा आणि आपण काय केले? याचा विचार करावा. मात्र, चर्चा जेवढी मागे जाईल तेवढ्या अडचणी निर्माण होतील, असा सूचक इशारा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नाव न घेता उपमुख्यमंत्री व पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांना दिला.
महापालिका निवडणुकीच्या निमित्ताने भाजप नेते व अजित पवार यांच्यामध्ये आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडत आहेत. अजित पवार विविध सभा व पत्रकार परिषदांमध्ये पुणे व पिंपरी-चिंचवड महापालिकेत भाजपच्या सत्ता काळात विकास न होता, भ्रष्टाचार वाढल्याचा आरोप करत आहेत. महापालिका निवडणुकीच्या प्रचारासाठी सोमवारी कात्रज चौकात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सभा झाली. या सभेत मुख्यमंत्री फडणवीस यांनी नाव न घेता, अजित पवार यांना सूचक इशारा देत महापालिका निवडणुकीत विरोधकांना पाणी पाजणार, असा विश्वास व्यक्त केला. तसेच आम्हाला राजकारण नाही तर शहराचा विकास करायचा असल्याचे नमूद केले.
फडणवीस म्हणाले, पुणे हे सांस्कृतिक, औद्योगिक आणि शैक्षणिकदृष्ट्या देशातील महत्त्वाचे शहर असून, राज्याचे आर्थिक इंजिन आहे. मागील पाच वर्षांत पुणे महापालिकेत सत्तेत असताना शहराचा सर्वांगीण विकास केला आहे. पुढील पाच वर्षांत शहराच्या सर्वांगीण विकासासाठी ८० हजार कोटी रुपयांच्या विविध विकासकामांच्या योजना राबविण्यासाठी विकास आराखडा तयार केला आहे. शहरातील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी उड्डाणपूल, रिंग रोड, ५४ किमी भुयारी मार्ग, तसेच इंटेलिजंट ट्रॅफिक सिस्टिम योजना राबविण्यात येणार आहे. एआय आधारित सीसीटीव्ही, स्मार्ट शाळा आणि परवडणारी आरोग्यसेवा उपलब्ध करून देण्याचा सरकारचा संकल्प असल्याचे फडणवीस यांनी सांगितले.
मुरलीधर मोहोळ म्हणाले, मागील पाच वर्षांत आम्ही ठोस काम केले, त्यामुळे शहरात आमूलाग्र बदल झाला. मात्र, त्यापूर्वी सत्तेत असणाऱ्यांनी व अनेक वर्षे पालकमंत्री असणाऱ्यांनी दूरदृष्टी न ठेवता कारभार केला, त्यामुळे शहरात समस्या निर्माण झाल्या.
चंद्रकांत पाटील म्हणाले, मागील निवडणुकीत बहुमत मिळून सलग पाच वर्षे भाजपला सत्ता दिली. त्यामुळे अनेक विकासकामे सुरू झाली. मात्र, अजित पवार मागील काही दिवस विकासकामांच्या नावाने भाजपवर टीका करत आहेत. परंतु अजित पवार अनेक वर्षे पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री राहिलेले आहेत, त्यांनी त्यांच्या काळात भरीव विकास का केला नाही? अशी विचारणा जनता आता करत आहे.
वाहतूक व्यवस्था सुधारण्यासाठी मोठी तरतूद करणार आहे. त्यामध्ये भुयारी मार्गांचे जाळे निर्माण केले जाईल, त्यासाठी ३२ हजार कोटी रुपयांची तरतूद केली जाईल तसेच पुणे शहराचा विचार करता शहरात क्षेत्रफळाच्या तुलनेत केवळ ९ टक्के क्षेत्रावर रस्ता आहे. ही टक्केवारी वाढविली जाईल. शहरातील ३२ रस्त्यांवर शहरातील ८० टक्के वाहतूक होत असून, त्या रस्त्यांचे रुंदीकरण करणे, वाहतुकीचे अडथळे दूर करणे आदी उपाययोजना केल्या जातील. सार्वजनिक वाहतूक व्यवस्था चांगली करण्यासाठी चार हजार इलेक्ट्रीक बसेस घेण्यात येतील. पुणे शहरातून इतर शहरांत जाणाऱ्या महामार्गांवर दुहेरी उड्डाणपूल, मेट्रोचे जाळे, आदी उभारणी केली जाईल. - देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री