PMC Election 2026: पुणे, पिंपरीत मतदानाचा उत्साह वाढला; दुसऱ्या टप्पात ११.३० पर्यंत मतदानाची टक्केवारी दुप्पट
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 15, 2026 12:35 IST2026-01-15T12:33:48+5:302026-01-15T12:35:03+5:30
PMC Election 2026 पुण्यात तरुणांपासून ज्येष्ठांपर्यंत सर्वजण मतदानाचा हक्क बजावताना दिसून येत आहेत.

PMC Election 2026: पुणे, पिंपरीत मतदानाचा उत्साह वाढला; दुसऱ्या टप्पात ११.३० पर्यंत मतदानाची टक्केवारी दुप्पट
पुणे : पुणे महापालिका निवडणुकीच्या ४१ प्रभागांसाठी १६५ जागा आहेत. तर पिंपरी चिंचवडच्या ३२ प्रभागांसाठी १२८ जागा आहेत. पुण्याच्या ४१ प्रभागांमध्ये ४ सदस्यीय ४० प्रभाग आहेत. प्रभाग क्रमांक ३८ हा पाच सदस्यीय आहे. या निवडणुकीत १६५ जागांसाठी १ हजार १५५ उमेदवार रिंगणात आहेत. तर पिंपरीत ६९२ उमेदवार लढत आहेत. आज सकाळपासून दोन्हीकडे उत्साहात मतदानाला सुरुवात झाली आहे.
पहिल्या टप्प्यात पुण्यात पहिल्या २ तासात सरासरी 5.50 टक्के मतदान झाले आहे. तर पिंपरी-चिंचवडमध्ये पहिल्या २ तासांत सरासरी ७ टक्के मतदान झाले होते. आता दुसऱ्या टप्प्यात ११.३० वाजेपर्यंत पुण्यात १२ टक्के तर पिंपरीत सरासरी १६.०३ टक्के मतदान झाले आहे. तरुणांपासून ज्येष्ठांपर्यंत सर्वजण मतदानाचा हक्क बजावताना दिसून येत आहेत. ज्येष्ठ नागरिक रिक्षा, गाडीने मतदानाला येत आहेत. त्यांच्याकडून नागरिकांना मतदान करण्याचे आवाहन करण्यात येत आहे.
पुणे आणि पिंपरीच्या काही भागात मशीन बंद पडल्याचे समोर आले आहे. काही ठिकाणी पुन्हा दुरुस्त करून मतदानाला सुरुवात झाली आहे. मशीन बंद पडल्याने नागरिकांना ताटकळत राहावे लागत असल्याचे चित्र दिसून आले आहे. ज्येष्ठांनी याबाबत नाराजी व्यक्त केली आहे. मतदार केंद्राबाहेर सेल्फी पॉईंट बसवण्यात आले आहे. नागरिक मतदानानंतर याठिकाणी सेल्फी काढताना दिसून येत आहेत. पोलिसांकडून अपंग, ज्येष्ठ नागरिकांना मतदान केंद्रापर्यंत पोहोचवण्यास मदत होते आहे.