PMC Election 2026: मोबाईलवरचे डॉक्युमेंट अखेर चालले; 'चालणार नाही' म्हणणाऱ्या केंद्राधिकाऱ्याला नमावे लागले
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 15, 2026 15:06 IST2026-01-15T15:06:32+5:302026-01-15T15:06:46+5:30
PMC Election 2026 'मोबाईलवरचे कागदपत्र चालणार नाही’ या लेखी सूचनेच्या आग्रहापुढे मतदान केंद्राधिकाऱ्याला अखेर नमावे लागले व मोबाईलवरचे आधारकार्डचे छायाचित्र मान्य करून त्या मतदाराला मतदान करू दिले गेले.

PMC Election 2026: मोबाईलवरचे डॉक्युमेंट अखेर चालले; 'चालणार नाही' म्हणणाऱ्या केंद्राधिकाऱ्याला नमावे लागले
पुणे : पुण्यात प्रभाग क्रमांक ३५, मतदान खोली क्रमांक २. मतदार त्याच्या नावाची सरकारी स्लिप घेऊन केंद्रात येतो. मतदान केंद्रातील अधिकारी त्याला ओळखपत्र मागतात. तो मोबाईलवरचे आधार कार्ड दाखवतो. ‘चालणार नाही!’. अधिकारी त्याला शांतपणे सांगतात. मग तो मोबाईलवरच असलेला वाहन चालवण्याचा परवाना दाखवतो. ‘चालणार नाही!’. तेवढ्याच शांतपणे अधिकारी त्याला सांगतात. त्यानंतर तो लाईटबील दाखवतो, मिळकत कराचे बील दाखवतो. ‘चालणार नाही! ‘यापैकी काहीही चालेल, पण ओरिजनल, मुळ सत्यप्रत लागेल.’ अधिकाऱ्याच्या या शांतपणे सांगण्यातून मतदार संतापतो. थोड्याच वेळात त्या अंधाऱ्या खोलीतील वातावरण एकदम गरम होते. का नाही चालणार? ठामपणे मतदार विचारतो.
‘आम्हाला तशा सुचना आहेत.’ अधिकारी तेवढाच शांत असतो. ‘दाखवा मग लेखी मला. कशात आहेत त्या सुचना! आता मतदाराचा आवाज ठाम झालेला असतो. ’नाही, आम्हाला मोबाईल केंद्रात आणू देऊ नका असे सांगण्यात आले होते.’ त्याचा अर्थ मोबाईलवरील कागदपत्र चालणार नाही असा होतो का? मतदाराच्या या प्रश्नांवर अधिकाऱ्याचा आवाज नरमतो. त्यानंतर ‘मोबाईलवरचे कागदपत्र चालणार नाही’ अशी लेखी सुचना, गॅझेट, निवडणुक आयोगाचा आदेश असे काहीही दाखवा या मतदाराच्या आग्रहापुढे मतदान केंद्राधिकाऱ्याला अखेर नमावे लागले व मोबाईलवरचे आधारकार्डचे छायाचित्र मान्य करून त्या मतदाराला मतदान करू दिले गेले.
याच प्रभागात दोन उमेदवार त्यांच्यासमोर प्रतिस्पर्धी उमेदवारच नसल्याने बिनविरोध निवडले गेले. त्यामुळे तिथे चारऐवजी दोनच मतदान यंत्र होती व त्यावर त्यात्या गटातील उमेदवारांची नावे, चिन्ह होते. काही मतदारांनी सांगितले की अशा प्रकारे दोनच यंत्र बसवणे अयोग्य आहे. काही जणांनी त्यांची उमेदवारी मागे घेतली, शिल्लक कोणी राहिले नाही, पण त्यांच्यामुळे आमचा मतदान करण्याचा हक्क हिरावला गेला. चार जणांना मतदान करण्याऐवजी आम्हाला दोघांनाच मतदान करावे लागले. दुसरी दोन यंत्र असली असतील तर तिथे आम्ही मतदान केले असते किंवा मग नोटा चा पर्याय दिला असता. त्यातल्याच काहीजणांनी मतदान केंद्राधिकाऱ्यांना याबाबत विचारणाही केली, मात्र आम्हाला वरून दोनच यंत्रे मिळाली, यापेक्षा जास्त काहीच ते सांगू शकले नाहीत.