PMC Election 2026: ओबीसींच्या हक्काच्या जागांवर मराठा समाजाचा डल्ला; ५२ बळकावल्याचा संघटनांचा आरोप
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 21, 2026 19:55 IST2026-01-21T19:54:28+5:302026-01-21T19:55:08+5:30
PMC Election 2026 पुणे महापालिकेच्या निवडणुकीमध्ये १६५ जागांपैकी ४४ जागा ओबीसींसाठी राखीव होत्या. त्यातील २६ जागांवर मराठा समाजातील उमेदवारांनी स्वतःला ‘कुणबी’ दाखवून निवडणूक लढवली

PMC Election 2026: ओबीसींच्या हक्काच्या जागांवर मराठा समाजाचा डल्ला; ५२ बळकावल्याचा संघटनांचा आरोप
पुणे : इतर मागासवर्गीय समाजाला (ओबीसी) स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये योग्य प्रतिनिधित्व मिळावे, यासाठी देण्यात आलेल्या आरक्षणावर सत्ताधारी व प्रबळ मराठा समाजाकडून डल्ला मारला जात आहे. पुणे आणि पिंपरी चिंचवड या दोन महापालिकांच्या निवडणुकीत ओबीसी समाजासाठी आरक्षित असलेल्या ५२ जागा मराठ्यांनी बळकावल्याचा आरोप ओबीसी संघटनांनी पत्रकार परिषदेत केला आहे.
स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये ओबीसी समाजाला प्रतिनिधित्व मिळावे, यासाठी २७ टक्के आरक्षण निश्चित करण्यात आले आहे. मात्र, सत्ताधारी व प्रबळ मराठा समाजाकडून बनावट कागदपत्रांद्वारे कुणबी प्रमाणपत्र मिळवून, त्याद्वारे ओबीसींच्या हक्काच्या जागा बळकावून ओबीसींच्या आरक्षणाची चोरी केली जाते. पुणे महापालिकेच्या नुकत्याच झालेल्या निवडणुकीमध्ये १६५ जागांपैकी ४४ जागा ओबीसींसाठी राखीव होत्या. त्यातील २६ जागांवर मराठा समाजातील उमेदवारांनी स्वतःला ‘कुणबी’ दाखवून निवडणूक लढवली आणि जिंकून जागेची चोरी केली. यामध्ये भाजपचे १७ आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या ९ नगरसेवकांचा समावेश आहे.
तसेच पिंपरी-चिंचवड महापालिकेत १२५ जगांपैकी ३४ जागा ओबीसींसाठी राखीव आहेत. मात्र, त्यापैकी २६ जागांवर मराठा समाजातील उमेदवारांनी 'कुणबी' म्हणून डल्ला मारला आहे. यामध्ये भाजपचे १७, राष्ट्रवादी काँग्रेसचे ७ आणि शिंदेसेनेच्या 2 नगरसेवकांचा समावेश आहे. हा प्रकार आम्ही निवडणूक आयोग, राज्य सरकार, राज्य मागासवर्ग आयोग, जात वैधता समिती, सामाजिक न्याय विभाग, मुंबई उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिली जाणार असल्याचे ओबीसी संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले. या पत्रकार परिषदेस मृणाल ढोले पाटील, सुरेश गायकवाड, आनंदा कुदळे, नंदकुमार गोसावी आदी उपस्थित होते.