PMC Election 2026 : जनता वसाहत सांस्कृतिक हॉल प्रभाग क्रमांक २८ मध्ये सकाळच्या वेळी पाऊण तास मशीन बंद
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 15, 2026 16:31 IST2026-01-15T16:29:26+5:302026-01-15T16:31:36+5:30
- सुरुवातीला पहिल्या दोन तासांत केवळ ७ टक्के, तर त्यानंतर जनता वसाहत येथील जनता ही कामगार आणि कष्टकरी असल्याने, कामाला जाताना आवरून, बाहेर पडून तिने मतदान केंद्रावर जाऊन मतदान केले.

PMC Election 2026 : जनता वसाहत सांस्कृतिक हॉल प्रभाग क्रमांक २८ मध्ये सकाळच्या वेळी पाऊण तास मशीन बंद
पुणे : पुणे महापालिका सार्वत्रिक निवडणुकीतील सकाळच्या पहिल्या दोन तासांच्या टप्प्यात साडेसात ते साडेनऊ या दोन तासांच्या वेळेत मतदान केंद्रावर सात टक्के मतदान झाले. जनता वसाहत सांस्कृतिक हॉल प्रभाग क्रमांक २८ या ठिकाणी चार मतदान केंद्रे असून, एक मतदान केंद्रातील बूथ क्रमांक ३ मधील मशीन पाऊण तासापासून बंद होते. सुरुवातीला पहिल्या दोन तासांत केवळ ७ टक्के, तर त्यानंतर जनता वसाहत येथील जनता ही कामगार आणि कष्टकरी असल्याने, कामाला जाताना आवरून, बाहेर पडून तिने मतदान केंद्रावर जाऊन मतदान केले. आवरून जाता-जाता ऑफिस, घरकाम करणाऱ्या नागरिकांनी सकाळी साडेनऊ ते साडेअकरा या वेळेत १५.२० टक्के मतदान केले. दुपारच्या वेळी मात्र येथील मतदान मंदावले. त्यानंतर मतदानाचा टक्का वाढेल, असे येथील अधिकाऱ्यांनी सांगितले.
जनता वसाहत येथील बंद पडलेल्या केंद्रावर ज्येष्ठ नागरिकांना पाऊण तास ताटकळत थांबावे लागले. यावेळी मतदार राजाराम जाधव (वय ६७) म्हणाले, या ठिकाणी पाऊण तास थांबलो. अद्यापही मशीन सुरू झाले नव्हते. आतापर्यंत मी पंधरा वेळा मतदान केले; पण मतपत्रिकेद्वारे मतदान केले तर बरे होईल. तीच मतदान प्रक्रिया योग्य आहे. ईव्हीएम मशीन प्रक्रियेत असा गोंधळ होतो आणि ज्येष्ठांना याचा त्रास सहन करावा लागत आहे. या महापालिका निवडणुकीत ज्येष्ठांच्या घरी जाऊन त्यांचे मतदान घेणारी यंत्रणा नसल्याने केंद्रांवर येऊन मतदान करावे लागत आहे. मात्र मशीन बंद पडल्याने ताटकळत थांबावे लागले. माझ्यासोबत इतर नागरिकांची गैरसोय झाली.
कामाला जाणारे युवक विनोद सरोदे व दिनेश मोरे म्हणाले, ‘आम्हा कामाला जायचे होते म्हणून सकाळच्या वेळी पहिले मतदान करून कामाला जावे आणि मतदानाचा हक्क बजावू. मात्र येथे मशीन बंद झाल्याने त्रास सहन करावा लागत असून ताटकळत थांबावे लागले. तसेच ज्येष्ठ नागरिक प्रभाकर सावळे वय (६७) म्हणाले, की मतदान करणे हे पहिले राष्ट्रीय कर्तव्य आहे. म्हणून गेल्या अनेक वर्षांपासून मी मतदानाचा हक्क बजावत आहे. यामध्ये अडथळा आला तरी मी माझा हक्क बजावणार आहे.’ यावेळी दोन महिन्यांच्या बाळाला घेऊन अनिषा तिखे (वय २४, जनता वसाहत) या महिलेने प्रथमच मतदानाचा हक्क बजावला. मतदान करणे हा आपला अधिकार असल्याचे त्या म्हणाल्या.