PMC Election 2026: पुण्यात काँग्रेसची एकेकाळी एकहाती सत्ता; आता पक्षात अंतर्गत गटबाजी, उद्धवसेनेच्या सोबतीचा फायदा होईल का?
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 1, 2026 12:40 IST2026-01-01T12:38:25+5:302026-01-01T12:40:25+5:30
PMC Election 2026 काँग्रेसच्या अंतर्गत गटबाजीचे ग्रहण यंदा दूर होऊन सर्वांनी एकदिलाने केलेले काम हे निकालातूनच स्पष्ट होणार आहे

PMC Election 2026: पुण्यात काँग्रेसची एकेकाळी एकहाती सत्ता; आता पक्षात अंतर्गत गटबाजी, उद्धवसेनेच्या सोबतीचा फायदा होईल का?
पुणे : एकेकाळी एकहाती सत्तेत असलेल्या काँग्रेस पक्षाला गेल्या निवडणुकीत केवळ एक आकडी संख्याबळ मिळाले होते. मात्र, आताच्या निवडणुकीत आघाडीत केवळ उद्धवसेना वाटेकरी असल्याने शंभरहून अधिक उमेदवार उभे करता आले आहेत. गटबाजी आणि काँग्रेस हे अतूट समीकरण असल्याने या निवडणुकीत पक्षाचे अस्तित्व टिकवण्यासाठी तरी ही गटबाजी संपून एकदिलाने काम होईल आणि एक आकडी संख्या दोन आकड्यांत पोहोचेल का, हे आव्हान आता पक्षासमोर उभे ठाकले आहे. या अंतर्गत गटबाजीचे ग्रहण यंदा दूर होऊन सर्वांनी एकदिलाने केलेले काम हे निकालातूनच स्पष्ट होणार आहे.
राष्ट्रवादी (शरद पवार)ने महाविकास आघाडीतून अजित पवार यांची साथ दिल्याने आघाडीत काँग्रेस व उद्धवसेनाच उरली. त्यामुळे काँग्रेसच्या वाट्याला सुमारे शंभरहून अधिक जागा आल्या आहेत. काँग्रेसमध्ये परंपरेनुसार अनेक गट आहेत. शहरातही ते आहेतच. आघाडीत मिळालेल्या या जागांमुळे सर्वच गटांना मनाजोगत्या जागा मिळाल्या आहेत. आपापल्या कुटुंबीयांना, नातेवाइकांना, समर्थकांना तिकिट देणे शक्य झाले आहे. त्यामुळे या प्रत्येकासाठी हे सर्व काम करतील हे अपेक्षितच आहे. मात्र, पक्षासाठी काम करून त्याचा परिणाम अंतिम निकालात दाखविणे हे खरे आव्हान या सर्व गटांपुढे आहे. एकेकाळी काँग्रेसची महापालिकेत एकहाती सत्ता होती. त्यानंतर पक्षाचा अधोगती सुरू झाली. सत्ता तर गेलीच मात्र, गेल्या निवडणुकीत पक्षाला केवळ एक आकडी संख्या गाठता आली होती. त्याला गटबाजी हेही एक महत्त्वाचे कारण होते.
मात्र, या निवडणुकीत हा शिक्का पुसण्यासाठी आता सर्वच गटांना एकत्रित काम करावे लागणार आहे. पक्षातील काही गटांची सोडचिठ्ठी आणि नव्याने काहींचा प्रवेश या पार्श्वभूमीवर हे गट जास्तीतजास्त नगरसेवक निवडून येण्यासाठी कसे काम करतात, हे निकालानंतरच स्पष्ट होणार आहे.