PMC Election 2026: पुण्यात निवडणुकीच्या नाकाबंदी दरम्यान सापडले तब्बल ६७ लाख
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 2, 2026 17:19 IST2026-01-02T17:18:09+5:302026-01-02T17:19:17+5:30
PMC Election 2026 रक्कम सासवड तालुक्यातील तक्रारवाडी येथील गट क्रमांक १३५ ही जमीन खरेदी करण्यासाठी रोख स्वरूपात देण्यासाठी नेत असल्याचे सांगितले आहे

PMC Election 2026: पुण्यात निवडणुकीच्या नाकाबंदी दरम्यान सापडले तब्बल ६७ लाख
कात्रज/धनकवडी : पुणे महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कात्रज येथील सर्व्हिलंन्स स्कॉड टीमने (एसएसटी) नाकाबंदी दरम्यान मोठी कारवाई केली आहे. कात्रज जंक्शन येथील एसएसटी नाकाबंदी पॉईंटवर तपासणी दरम्यान टोयोटा हायरायडर चारचाकी वाहनातून तब्बल ६७ लाख रुपयांची रोख रक्कम जप्त करण्यात आली. संबंधित वाहनही ताब्यात घेण्यात आले आहे. शुक्रवारी (दि. २ ) सकाळी एसएसटी पथक प्रमुख अधिकारी आरोग्य निरीक्षक योगेश सुरेश माने यांच्या नेतृत्वाखाली ही कारवाई करण्यात आली.
तपासणी दरम्यान एमएच १२ व्ही.झेड. ४०१४ क्रमांकाची पांढऱ्या रंगाची टोयोटा हायरायडर कार थांबवण्यात आली. वाहनात मालक तुषार विजय मिरजकर ( ३९, रा. सासवड, पुणे) असल्याचे निष्पन्न झाले. त्याच्यासोबत वाहनात अनिल शंकर कामठे आणि गणेश बाळासाहेब जगताप हे दोघे उपस्थित होते. वाहनाच्या मागील डिकीत तपासणी केली असता लाल रंगाच्या पिशव्यांमध्ये विविध चलनी नोटांचे बंडल आढळून आले. चौकशी दरम्यान चालकाने ही रक्कम सासवड तालुक्यातील तक्रारवाडी येथील गट क्रमांक १३५ ही जमीन खरेदी करण्यासाठी रोख स्वरूपात देण्यासाठी नेत असल्याचे सांगितले. मात्र, निवडणूक आचारसंहितेच्या पार्श्वभूमीवर रक्कमेची शहानिशा आवश्यक असल्याने पंचनामा करून रक्कम जप्त करण्यात आली. ही संपूर्ण कारवाई पंचांच्या व पोलिसांच्या उपस्थितीत करण्यात आली असून रोकड सीलबंद करून ताब्यात घेण्यात आली आहे. संबंधित टोयोटा हायरायडर वाहनही महानगरपालिकेच्या सुरक्षित ठिकाणी ठेवण्यात आले आहे. प्रकरणाची माहिती नोडल अधिकारी श्रीपाद नाईक यांच्यामार्फत आयकर विभागाला देण्यात आली असून आयकर विभागाचे अधिकारी पुढील तपासासाठी घटनास्थळी दाखल होत आहेत.