PMC Election 2026: पुणे महापालिकेत ४४ लाख पुरुष मतदार; ४१ लाख महिला, महिलांना दिलेली आश्वासने मतपेटीवर परिणाम करणार?
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 14, 2026 11:28 IST2026-01-14T11:27:34+5:302026-01-14T11:28:46+5:30
PMC Election 2026 महापालिकेच्या प्रश्नांशी महिलांचा थेट संबंध असून पाणीपुरवठा, स्वच्छता, आरोग्य सेवा, अंगणवाडी, शाळा, रस्त्यांवरील प्रकाश, सार्वजनिक वाहतूक हे सगळे विषय महिलांच्या दैनंदिन आयुष्याशी जोडलेले आहेत

PMC Election 2026: पुणे महापालिकेत ४४ लाख पुरुष मतदार; ४१ लाख महिला, महिलांना दिलेली आश्वासने मतपेटीवर परिणाम करणार?
पुणे : पुणे महापालिकेत पुरुष मतदारांची संख्या ४४ लाख ९१ हजार ६८, तर महिलांची संख्या ही ४१ लाख ५५ हजार ३३० इतकी आहे. हा आकडा पाहिला तर महिला मतदारांची संख्या पुरुषांच्या जवळपास पोहोचली आहे. विधानसभा निवडणुकीत महिलांचा मतदानाचा टक्का वाढलेला आहे. त्यामुळे महिलांना उद्देशून दिलेली आश्वासने ही थेट मतपेटीवर परिणाम करणारी रणनीती मानली जात आहे. महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच पक्षांनी जाहीरनाम्यात महिलांसाठी विविध योजना आणि आश्वासनांची खैरात केली आहे. मात्र, सुरक्षितता, आरोग्य, रोजगार, शिक्षण आणि आर्थिक सक्षमीकरण या मुद्द्यांवर पक्षांकडून भर देण्यात येत असला, तरी महिला मतदारांमध्ये आश्वासनांपेक्षा प्रत्यक्ष अंमलबजावणीबाबतच अधिक अपेक्षा व्यक्त होत आहेत.
महापालिकेच्या प्रश्नांशी महिलांचा थेट संबंध आहे. पाणीपुरवठा, स्वच्छता, आरोग्य सेवा, अंगणवाडी, शाळा, रस्त्यांवरील प्रकाश, सार्वजनिक वाहतूक हे सगळे विषय महिलांच्या दैनंदिन आयुष्याशी थेट जोडलेले आहेत. त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत महिलांचे मुद्दे अग्रक्रमावर ठेवणे हे पक्षांना अपरिहार्य ठरत आहे. यासाठीच प्रत्येक पक्षाने खास महिला मतदारांना आकर्षित करण्यासाठी आश्वासनांची खैरात केली आहे. शिंदेसेनेने महिलांना तिकिटाचा निम्मा दर आकारणार, गर्दीच्या वेळी महिला स्पेशल बस चालू करणार असल्याची घोषणा केली आहे. तर काँग्रेस महिलांना पीएमपीचा मोफत प्रवास देणार आहे. राष्ट्रवादी (शरद पवार) आणि राष्ट्रवादी (अजित पवार)ने पुणे महानगरपालिका क्षेत्रात २०० 'राजमाता जिजाऊ क्लिनिक', अद्ययावत प्राथमिक आरोग्य केंद्र) उभारली जातील. येथे तपासणी, आरोग्य सेवा आणि महत्त्वाची औषधे मोफत मिळतील, ज्यामुळे मोठ्या रुग्णालयांवरील ताण कमी होईल, यावर भर दिला आहे. तसेच आनंदीबाई जनजागृती मोहिमेंतर्गत सर्व आरोग्य केंद्रांच्या परिसरात दरमहा विशेष शिबिरे आयोजित केली जातील. याद्वारे नवविवाहित महिलांना सीझर टाळण्याचे उपाय, आरोग्य आणि सुरक्षित बाळंतपणाबाबत मार्गदर्शन केले जाईल. आई आणि बाळाचे आरोग्य जपण्यासाठी वेळेवर समुपदेशन आणि वैद्यकीय सल्ला दिला जाईल, असेही जाहीरनाम्यात नमूद केले आहे. राज्य सरकारच्या 'लाडकी बहीण योजने'अंतर्गत गरीब महिलांना दरमहा २,५०० रुपये आणि ५०० चौरस फुटांपेक्षा कमी क्षेत्रफळाच्या घरांसाठी आणि फ्लॅटसाठी मालमत्ता कर माफ करण्याचे भाजपने महिलांना आश्वासित केले आहे.
पुण्यासारख्या शहरात नोकरदार महिला, शिक्षित गृहिणी आणि तरुणी यांचा मोठा वर्ग आहे. हा वर्ग सोशल मीडिया, नागरी प्रश्न आणि प्रशासनाच्या कामगिरीवर लक्ष ठेवणारा आहे. त्यामुळे त्यांच्या अपेक्षा जाहीरनाम्यात प्रतिबिंबित करणे पक्षांना भाग पडत आहे. महिलांना केंद्रस्थानी ठेवणे म्हणजे पक्ष समावेशक, प्रगत आणि संवेदनशील असल्याचा संदेश दिला जात असल्याचेही सांगितले जात आहे.