PMC Election 2026 : येत्या तीन महिन्यांत २,५०० बस पुणेकरांच्या सेवेत;१०० नवे मार्ग,डबल डेकरही धावणार
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 10, 2026 13:23 IST2026-01-10T13:22:14+5:302026-01-10T13:23:30+5:30
रोज १८ ते २० लाख प्रवाशांना सुरक्षित, जलद आणि पर्यावरणपूरक वाहतूक सेवा उपलब्ध होईल, असे मोहोळ यांनी स्पष्ट केले.

PMC Election 2026 : येत्या तीन महिन्यांत २,५०० बस पुणेकरांच्या सेवेत;१०० नवे मार्ग,डबल डेकरही धावणार
पुणे : शहराच्या सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा महत्त्वाकांक्षी विस्तार करण्याची योजना हाती घेण्यात आली असून येत्या एप्रिल-मेपर्यंत अडीच हजार नव्या बस पीएमपीएमएलच्या ताफ्यात दाखल होतील, अशी माहिती पुण्याचे खासदार आणि केंद्रीय सहकार व नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी शुक्रवारी (दि. ९) येथे दिली. यापूर्वी कधी नव्हे इतक्या जलदगतीने पुण्यातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा विस्तार केला जात आहे. यामुळे चार हजार बसगाड्यांचा ताफा पुणेकरांसाठी सज्ज होईल. यातून रोज १८ ते २० लाख प्रवाशांना सुरक्षित, जलद आणि पर्यावरणपूरक वाहतूक सेवा उपलब्ध होईल, असे मोहोळ यांनी स्पष्ट केले.
महापालिका निवडणुकीच्या प्रचारासाठी खासदार मोहोळ यांनी पर्वती विधानसभा मतदारसंघात मतदारांशी संपर्क साधला. नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ यावेळी उपस्थित होत्या. यावेळी पत्रकारांशी बोलताना मोहोळ म्हणाले, “अतिरिक्त बसगाड्यांमुळे सध्याच्या ३९४ मार्गांमध्ये, किमान १०० नव्या मार्गांची भर पडणार आहे. याचा फायदा उपनगरांमधील दुर्लक्षित भाग व नव्याने समाविष्ट झालेल्या गावांतील पुणेकर नागरिकांना होणार आहे.”
पुण्यातली वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सक्षम करण्यावर भाजपाने भर दिला आहे. मेट्रोचे विस्तारीकरण आणि पर्यावरणपूरक बसगाड्यांची संख्या वाढविण्याचे धोरण स्वीकारले आहे. त्यासाठीच मेट्रो आणि पीएमपी या दोन्ही सेवा कार्यक्षमतेने चालवण्याचे नियोजन आहे, असे खासदार मोहोळ यांनी सांगितले. पुण्यासाठी केंद्राने १,००० इलेक्ट्रिक आणि १,००० सीएनजी बस नुकत्याच जाहीर केल्या आहेत. ही प्रक्रिया सुरू झाली आहे. बसचा ताफा वाढल्यानंतर ‘पीएमपीएमएल’ची १८१ एकर जागा विकसित केली जाईल, अशी माहितीही मोहोळ यांनी दिली.
प्रदूषण कमी करण्यासाठी पीएमपीएमएलच्या ताफा डिझेलमुक्त बसगाड्यांचा केला जात आहे. याचाच भाग म्हणून २५ इलेक्ट्रिक डबल-डेकर गाड्या भाडेतत्त्वावर घेतल्या जात आहेत. गेल्या सप्टेंबरमध्ये डबल डेकरची १० दिवसांची प्रायोगिक चाचणी घेतली गेली. हा अहवाल सकारात्मक आला. त्यामुळे लवकरच हिंजवडी फेज ३, रामवाडी मेट्रो स्थानक-खराडी, मगरपट्टा सिटी-कल्याणी नगर मेट्रो, पुणे रेल्वे स्थानक-लोहगाव विमानतळ, देहू-आळंदी, चिंचवड-हिंजवडी आदी मार्गांवर डबल-डेकर बस धावताना दिसेल. - मुरलीधर मोहोळ, केंद्रीय सहकार व विमान वाहतूक राज्यमंत्री