महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीचा जागावाटपाचा तिढा सुटेना
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 23, 2025 16:03 IST2025-12-23T15:59:17+5:302025-12-23T16:03:19+5:30
- इच्छुकांची घालमेल; शिंदेसेना १५ जागांवर अडून, रिपाइंला दोनच जागा

महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीचा जागावाटपाचा तिढा सुटेना
पिंपरी : महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीतील जागावाटपाचा तिढा सुटलेला नाही. भाजप, शिवसेना (शिंदेसेना) आणि रिपब्लिकन पक्ष (आठवले गट) यांच्यातील जागावाटपावरून एकमत झालेले नाही. शिवसेना (शिंदेसेना) तब्बल १५ जागांवर ठाम राहिल्याने चर्चांना ब्रेक लागला असून, रिपाइंला केवळ दोनच जागा देण्याच्या भूमिकेवर भाजप अडून बसल्याची शहरात चर्चा आहे.
शिंदेसेनेकडून ‘महायुती सरकारमधील भागीदारी, संघटनात्मक ताकद आणि मागील निवडणुकीतील कामगिरी’चा दाखला देत शहरात किमान १५ जागांची मागणी केली जात आहे. मात्र, भाजपकडून याबाबत हिरवा कंदील दिलेला नाही. दुसरीकडे, रिपाइं (आठवले गट)ला महायुतीत प्रतीकात्मक प्रतिनिधित्व म्हणून केवळ दोन जागांची ऑफर दिली आहे, त्यामुळे नाराजी आहे. शहरातील दलितबहुल आणि मिश्र लोकसंख्येच्या प्रभागांमध्ये रिपाइंची संघटनात्मक ताकद लक्षात न घेतल्याचा आरोप पक्षातील नेते करत आहेत. ‘सन्मानजनक जागावाटप न झाल्यास स्वतंत्र निर्णय घ्यावा लागेल,’ असा इशाराही रिपाइंचे अध्यक्ष रामदास आठवले यांनी दिला होता. मात्र, आम्ही भाजपसोबत लढणार असल्याने स्थानिक नेत्यांकडून सांगितले जात आहे.
संघटनात्मक हालचाली मंदावल्या
शिवसेना शिंदेसेनेतील इच्छुकांनी काही प्रभागांमध्ये तयारी सुरू ठेवली असली तरी अंतिम निर्णय नसल्याने प्रचार उघडपणे करता येत नाही. रिपाइंचे कार्यकर्तेही संभ्रमात असून उमेदवारीची खात्री नसल्याने संघटनात्मक हालचाली मंदावल्या आहेत.
प्रचारावरही परिणाम
जागावाटप रखडल्याचा थेट परिणाम प्रचारावर दिसून येत आहे. उमेदवारांना कार्यालये उघडणे, प्रचार साहित्य छापणे, कार्यकर्त्यांचे जाळे उभे करणे याबाबत निर्णय घेता येत नाही. अनेक इच्छुकांनी सोशल मीडियावरील पोस्ट, बॅनर, प्रचारफलक तात्पुरते थांबवले असून अंतिम निर्णयाची वाट पाहत आहेत.
बंडखोरी रोखण्याचे आव्हान
काही ठिकाणी मात्र, स्वतंत्र तयारी सुरू असल्याने बंडखोरीची शक्यता व्यक्त होत आहे. ‘एकला चलो’चा पर्यायही काही पक्षांकडून चर्चेत आहे. जागावाटपात अपेक्षित न्याय न मिळाल्यास स्वतंत्रपणे निवडणूक लढवण्याची भूमिका काही नेत्यांनी उघडपणे मांडल्याची चर्चा आहे. जागावाटप रखडल्याने महायुतीत अस्वस्थता वाढत असल्याचे सध्या दिसून येत आहे. उमेदवारी अर्ज भरण्याची अंतिम मुदत जवळ येत असताना वरिष्ठ पातळीवर तोडगा निघणार की नाही, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. वेळेत निर्णय न झाल्यास महायुतीतील अंतर्गत वादाचा फायदा विरोधक घेण्याची शक्यता राजकीय वर्तुळात व्यक्त केली जात आहे.