Pimpri Chinchwad आयुक्तांचा 'अभ्यास' की एप्रिल फूल ? महापौरांचे शब्दही वाऱ्यावर
By ज्ञानेश्वर भंडारे | Updated: April 4, 2026 14:28 IST2026-04-04T14:26:55+5:302026-04-04T14:28:45+5:30
- 'पिंपरी-चिंचवडला कोण ओळखते?' वादावर साधी माफीही नाही; पूर्णवेळ आयुक्त मिळूनही निर्णयप्रक्रियेला अपेक्षित वेग मिळत नसल्याची नागरिकांकडून टीका

Pimpri Chinchwad आयुक्तांचा 'अभ्यास' की एप्रिल फूल ? महापौरांचे शब्दही वाऱ्यावर
पिंपरी : महापालिकेत नवीन आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी रुजू होऊन महिना होत आला आहे, तरी शहराच्या दृष्टीने एकही ठोस निर्णय न झाल्याने प्रशासनाच्या कार्यशैलीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. महापौरांनी पत्रकार परिषदेत १ एप्रिलपासून आयुक्त प्रत्यक्ष कामाला सुरुवात करतील, असे जाहीर केले होते.
मात्र, १ एप्रिल उलटूनही महत्त्वाच्या विषयांवर कोणतीही निर्णायक हालचाल न झाल्याने महापौरांच्या शब्दांनाही केराची टोपली दाखविल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.शहराला वेगवान निर्णयक्षम प्रशासनाची गरज असताना आयुक्त अजूनही 'अभ्यास' करण्यातच गुंतल्याचे चित्र दिसत आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये 'हा शहराचा एप्रिल फूल तर नाही ना?' अशी उपरोधिक प्रतिक्रिया उमटत आहे.
आयुक्तांकडून साधी दिलगिरीही नाही...
'पिंपरी-चिंचवडला कोण ओळखते?' या कथित वक्तव्यामुळे वाद आणखी चिघळला आहे. शहराच्या अस्मितेला धक्का देणाऱ्या या वक्तव्याचा आमदारांसह सर्वपक्षीय राजकीय नेत्यांनी तीव्र निषेध केला होता. शहराची औद्योगिक, शैक्षणिक आणि नागरी विकासातील राज्यभर ओळख असताना असे विधान केल्याने संताप व्यक्त करण्यात आला. मात्र, एवढ्या निषेधानंतरही आयुक्तांकडून साधी दिलगिरीही व्यक्त करण्यात आलेली नाही. त्यामुळे प्रशासनाची संवेदनशीलता आणि लोकप्रतिनिधींबाबतचा दृष्टिकोन यावर प्रश्न उपस्थित होत आहेत.
तत्कालीन आयुक्त हर्डीकर यांच्याच पद्धतीचा कित्ता
तत्कालीन आयुक्त शेखर सिंह यांच्या बदलीनंतर अतिरिक्त पदभार श्रावण हर्डीकर यांच्याकडे दिला. त्या काळातही निर्णयप्रक्रियेला अपेक्षित वेग मिळाला नाही, अशी टीका झाली होती. आता पूर्णवेळ आयुक्तांनीही त्याच पद्धतीचा कित्ता गिरविल्याची चर्चा आहे.
विविध विकासकामांचे प्रस्ताव प्रलंबित
महापालिकेतील पाणीपुरवठा, रस्ते, आरोग्य, महसूल, अनधिकृत बांधकामांवरील कारवाई, करसंकलन आणि विविध विकासकामांचे प्रस्ताव असे अनेक विषय सध्या प्रलंबित आहेत.