Pimpari-chinchwad : स्थायी समितीची माळ कोणाच्या गळ्यात; ‘एक व्यक्ती एक पद’ फॉर्म्युला राबवणार?

By ज्ञानेश्वर भंडारे | Updated: February 20, 2026 09:42 IST2026-02-20T09:40:26+5:302026-02-20T09:42:42+5:30

- महापालिकेच्या आजच्या सभेकडे शहराचे लक्ष : सत्ताधारी भाजपमध्ये पडद्यामागील हालचालींना वेग; स्थानिकांच्या प्रस्तावाला डावलून प्रदेश पातळीवरून वेगळेच नाव येण्याची शक्यता

pimpari-chinchwad Who will be the head of the Standing Committee; will the 'one person, one post' formula be implemented? | Pimpari-chinchwad : स्थायी समितीची माळ कोणाच्या गळ्यात; ‘एक व्यक्ती एक पद’ फॉर्म्युला राबवणार?

Pimpari-chinchwad : स्थायी समितीची माळ कोणाच्या गळ्यात; ‘एक व्यक्ती एक पद’ फॉर्म्युला राबवणार?

पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या शुक्रवारी होणाऱ्या सर्वसाधारण सभेत स्थायी समिती अध्यक्षांसह विविध विषय समित्यांची घोषणा होणार असल्याने सत्ताधारी भाजपमध्ये पडद्यामागील हालचालींना वेग आला आहे. विशेषतः कोट्यवधीच्या विकासकामांना मंजुरी देणाऱ्या स्थायी समितीच्या अध्यक्षपदासाठी जोरदार रस्सीखेच सुरू आहे. ‘एक व्यक्ती एक पद’ फॉर्म्युला राबवला गेल्यास प्रदेश पातळीवरून वेगळेच नाव येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

महापालिकेचा २०२६-२७ चा अर्थसंकल्प लवकरच सादर होणार असून, त्याआधी स्थायी समिती अध्यक्षाची निवड महत्त्वाची ठरणार आहे. रस्ते, पाणीपुरवठा, मलनिस्सारण, स्मार्ट सिटीतील अपूर्ण प्रकल्प, तसेच प्रभागांतील प्रलंबित कामांवर शिक्कामोर्तब करण्याचा अधिकार स्थायी समितीकडे असल्याने या पदाला विशेष महत्त्व आहे. अध्यक्षपदी कोणाची निवड होते, यावर पुढील वर्षातील विकासकामांची दिशा अवलंबून राहणार आहे.

स्थायी समितीचे अध्यक्षपद आपल्याच समर्थकाला मिळावे, यासाठी भाजपचे चारही आमदार प्रयत्नशील असल्याचे बोलले जात आहे. पक्षातील विरोधकांना समित्यांमध्ये प्रतिनिधित्व मिळू नये, यासाठीही प्रयत्न सुरू आहेत. या सभेत केवळ समित्यांची घोषणा होणार नसून, सत्ताधारी भाजपमधील अंतर्गत शक्ती-संतुलन दिसून येणार आहे. स्थायी समिती अध्यक्षपदाचा फैसला केवळ पदनियुक्ती न राहता, शहरातील राजकीय समीकरणांना आकार देणारा ठरणार आहे.
----

नव्या चेहऱ्यांना संधी देण्याचा विचार

भाजपमध्ये ‘एक पद, एक व्यक्ती’ हा फॉर्म्युला लागू असल्याने शहराध्यक्ष बापू काटे आणि शैलजा मोरे, राहुल जाधव यांची नावे मागे पडण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. नुकतेच पक्षात दाखल झालेले राहुल कलाटे यांचे नाव चर्चेत असले, तरी स्थानिक पदाधिकाऱ्यांचा त्यांना विरोध असल्याचे बोलले जाते. प्रभाग पातळीवरील गटबाजी आणि जुन्या-नव्यांच्या संघर्षामुळे त्यांच्या दावेदारीबाबत संभ्रम आहे. पक्षाचे निष्ठावंत शीतल शिंदे यांचे नाव उपमहापौरपदासाठी जाहीर झाले होते; मात्र त्यांनी ते पद नाकारल्याने त्यांना स्थायी अध्यक्षपदाची संधी मिळण्याची शक्यता धूसर मानली जाते. दुसरीकडे स्नेहा कलाटे, अभिषेक बारणे आणि सुप्रिया चांदगुडे या नव्या चेहऱ्यांची नावे आघाडीवर आहेत. राज्य पातळीवरील संपर्क, संघटनात्मक कामाचा अनुभव आणि पुढील निवडणुकीच्या दृष्टीने नव्या चेहऱ्यांना संधी देण्याचा पक्षाचा विचार होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

महापौर, गटनेते निवडीवेळी धक्का

महापौर निवडीवेळी रवी लांडगे यांचे नाव मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुढे केल्याची चर्चा झाली होती. गटनेते प्रशांत शितोळे यांची निवडही प्रदेश पातळीवरून झाली. उपमहापौरपदही शर्मिला बाबर यांना ऐनवेळी देण्यात आले. त्यामुळे स्थानिक आमदारांना डावलून काही निर्णय होत असल्याची नाराजी आडून-आडून व्यक्त होत आहे. त्याची पुनरावृत्ती स्थायी समितीच्या अध्यक्ष निवडीतही होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Web Title : पिंपरी-चिंचवड: स्थायी समिति का अध्यक्ष कौन? क्या 'एक व्यक्ति, एक पद' फॉर्मूला?

Web Summary : पिंपरी-चिंचवड भाजपा में स्थायी समिति अध्यक्ष पद के लिए कड़ी प्रतिस्पर्धा। 'एक व्यक्ति, एक पद' फॉर्मूला अप्रत्याशित उम्मीदवार ला सकता है। गुटबाजी और नए चेहरे निर्णय को जटिल बनाते हैं।

Web Title : Pimpri-Chinchwad: Who will head the Standing Committee? One person, one post?

Web Summary : Pimpri-Chinchwad BJP anticipates intense competition for Standing Committee head. 'One person, one post' formula may introduce unexpected candidate. Factionalism and new faces complicate the decision.