PCMC Election 2026 : प्रचारफेरी, सभा, मिरवणूक परवानगीसाठी एक खिडकी परवानगी कक्ष
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 4, 2026 13:39 IST2026-01-04T13:37:15+5:302026-01-04T13:39:10+5:30
उमेदवाराने मागणी केलेल्या परवानगीनुसार आवश्यक फी शुल्क भरणे आवश्यक आहे.

PCMC Election 2026 : प्रचारफेरी, सभा, मिरवणूक परवानगीसाठी एक खिडकी परवानगी कक्ष
पुणे :पुणे महापालिकेच्या निवडणुकीसाठी उभे असलेले उमेदवार प्रचारफेरी, सभा, मिरवणूक याद्वारे प्रचार करणार आहेत. त्यासाठी बोर्ड बॅनर, फ्लेक्स, प्रचार वाहने प्रचारफेरी, सभा आणि मिरवणुकीसाठी पालिकेकडून निवडणूक कक्षाची परवानगी घेणे आवश्यक आहे. या एक खिडकी परवानगी कक्षाचे उद्घाटन आयुक्त नवल किशोर राम यांच्या हस्ते झाले. या ऑनलाइन प्रणालीद्वारे प्रचारफेरी आणि सभा मिरवणूक, तसेच विविध परवानगी प्रमाणपत्र देण्याची यंत्रणा कार्यरत करण्यात आली आहे.
यावेळी अतिरिक्त आयुक्त ओमप्रकाश दिवटे, उपायुक्त प्रसाद काटकर, रवी पवार, राहुल जगताप आदी उपस्थित होते. पुणे महापालिकेने प्रथमच ही ऑनलाइन यंत्रणा सुरू केली आहे. https://electionpermits.pmc.gov.in/ या ऑनलाइन प्रणालीद्वारे पालिकेच्या एकूण १५ क्षेत्रीय कार्यालयात जोडण्यात आले आहेत. उमेदवाराने मागणी केलेल्या परवानगीनुसार आवश्यक फी शुल्क भरणे आवश्यक आहे.
शुल्क जमा केल्यानंतर आवश्यक असणारे प्रचारफेरी, सभा, मिरवणूक तसेच विविध परवानगीचे पत्र प्राप्त होणार आहे. ऑनलाइन/ऑफलाइन अर्ज करण्याची वेळ सकाळी ९:४५ ते सायंकाळी ६:१५ अशी निश्चित करण्यात आलेली आहे. उमेदवार एकावेळी सर्व प्रकारच्या परवानग्यांसाठी या लिंकचा वापर करू शकतात. तसेच उमेदवारास परवानगीविषयक अद्ययावत माहिती मिळण्यास मदत होणार असून, या प्रणालीमुळे उमेदवारांचा वेळ वाचण्यास मदत होणार आहे.