दोन्ही राष्ट्रवादीमध्ये अजूनही काही ठरलेले नाही; अंतिम प्रस्ताव आल्यावर विचार होईल - सुप्रिया सुळे
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 25, 2025 18:39 IST2025-12-25T18:38:48+5:302025-12-25T18:39:50+5:30
मी माझ्याकडून महापालिका निवडणुकीमध्ये महाविकास आघाडी तुटणार नाही, यासाठी शेवटपर्यंत प्रयत्न करणार आहे

दोन्ही राष्ट्रवादीमध्ये अजूनही काही ठरलेले नाही; अंतिम प्रस्ताव आल्यावर विचार होईल - सुप्रिया सुळे
पुणे : राष्ट्रवादी (शरद पवार) गटाचे नेते गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादी (अजित पवार) दोन्ही पक्षांमध्ये महापालिका निवडणुकीबाबत बैठका सुरू असुनही अंतिम प्रस्ताव आलेला नाही. पण महापालिका निवडणुकीचा निर्णय स्थानिक नेत्यांकडूनच घेतला जाणार आहे. त्यानंतर अंतिम प्रस्तावावर प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे निर्णय देतील. पुण्यातील जागांची माहिती माझ्याकडे आलेली नाही. मात्र राज्यात सगळीकडेच जागांबाबत वाटाघाटी सुरू आहेत. दोन्ही राष्ट्रवादीमध्ये अजूनही काही ठरलेले नाही. अंतिम निर्णय झाल्यानंतर अटी व शर्तींवर विचार होईल.' ' असे राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या कार्याध्यक्ष सुप्रिया सुळे यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.
पुण्यातील जागांची माहिती माझ्याकडे आलेली नाही. पुणे महापालिका निवडणुकीसाठी आमच्या पक्षाकडून सर्व अधिकार विशाल तांबे, ॲड.वंदना चव्हाण, अंकुश काकडे यांच्यासह स्थानिक नेत्यांना दिले आहेत महापालिका, जिल्हा परिषदेच्या निवडणुका मागील १८ वर्षात कॉंग्रेस व राष्ट्रवादी कॉंग्रेसने कधीच एकत्र लढलेल्या नाहीत.'उद्धव ठाकरे यांच्यासमवेत पक्षाचे नेते जयंत पाटील यांची चर्चा झाली आहे, काही जागांबाबत राज ठाकरे यांच्याशी देखील आम्हाला बोलावे लागणार आहे. तर वडेट्टीवार कॉंग्रेस स्वतंत्र लढणार असे बोलले असले, तरीही मी माझ्याकडून महापालिका निवडणुकीमध्ये महाविकास आघाडी तुटणार नाही, यासाठी शेवटपर्यंत प्रयत्न करणार आहे, असे सुप्रिया सुळे यांनी सांगितले.
"रोज नई सुभह होती है"
राष्ट्रवादी कॉग्रेस (शरद पवार)च्या शहराध्यक्षपदाचा प्रशांत जगताप यांनी राजीनामा दिला आहे. त्याबददल विचारले असताना खासदार सुप्रिया सुळे म्हणाले, प्रशांत जगताप यांना माझ्या शुभेच्छा आणि "रोज नई सुभह होती है". असे एका वाक्यामध्ये उत्तर दिलं.