राष्ट्रवादी शरद पवार पक्षाची दांडी; काँग्रेस आणि उद्धवसेनेच्या जागा वाटपाचा फाॅर्म्युला ठरला; मनसेही सोबत लढणार
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 29, 2025 12:19 IST2025-12-29T12:19:15+5:302025-12-29T12:19:53+5:30
उद्धवसेनेला ६५ जागा देण्याचे ठरल्याने उद्धवसेना आपल्या कोट्यातून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला जागा देणार आहे

राष्ट्रवादी शरद पवार पक्षाची दांडी; काँग्रेस आणि उद्धवसेनेच्या जागा वाटपाचा फाॅर्म्युला ठरला; मनसेही सोबत लढणार
पुणे : पुणे महापालिका निवडणुकीसाठी काँग्रेस आणि उद्धवसेनेच्या नेत्यांची बैठक झाली. या बैठकीत राष्ट्रवादी (शरद पवार) पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी दांडी मारली. त्यामुळे राष्ट्रवादीशिवायच बोलणी पूर्ण करण्याचा निर्णय दोन्ही पक्षांनी घेतला. त्यात काँग्रेसला १०० जागा तर उद्धवसेनेला ६५ जागा देण्याचे निश्चित करण्यात आले. या दोन्ही पक्षाच्या जागावाटपाची आणि आघाडीची घोषणा सोमवारी होण्याची शक्यता आहे.
काँग्रेस आणि उद्धवसेनेच्या शहर पातळीवरील नेत्यांची बैठक काँग्रेस भवनात झाली. या बैठकीत काँग्रेस व मित्रपक्षांना १०० जागा देण्यात आल्या. उद्धवसेनेला ६५ जागा देण्याचे ठरले. उद्धवसेना आपल्या कोट्यातून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला जागा देईल, असे ठरले. मात्र, काही जागांवर एकमत न झाल्याने याबाबतचा निर्णय काँग्रेसचे नेते सतेज ऊर्फ बंटी पाटील आणि शिवसेनेचे संपर्कप्रमुख सचिन अहीर यांच्या बैठकीत होईल, असे सांगण्यात आले. पाटील व सचिन अहीर यांची चर्चा रात्री उशिरापर्यंत सुरू होती.
दरम्यान, महापालिका निवडणुकीसाठी उद्धवसेना आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची युती पूर्वीच जाहीर झाली आहे. पुण्यातही दोन्ही पक्ष एकत्र निवडणूक लढवणार आहेत. त्यानुसार दोघांच्या चर्चेत ९१ जागा शिवसेनेला तर मनसेला ७४ जागा अशा ‘फॉर्म्युला’ ठरविण्यात आला. मात्र, काँग्रेससोबत आघाडी झाल्यास हे सूत्र बदलणार असून आम्ही शिवसेनेकडे ३५ जागांची मागणी केली असल्याचे त्यांनी सांगितले.