मुस्लिम बांधवांनी केले मानाच्या गणपतींचे स्वागत
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 13, 2019 16:56 IST2019-09-13T16:52:57+5:302019-09-13T16:56:13+5:30
दरवर्षीप्रमाणे यंदाही विसर्जन मिरवणुकीत सामाजिक सलाेखा जपण्यात आला. मुस्लिम बांधवांनी बेलबाग चाैकात मानाच्या गणपतींचे स्वागत केले.

मुस्लिम बांधवांनी केले मानाच्या गणपतींचे स्वागत
पुणे : गेल्या 11 वर्षापासून विसर्जन मिरवणुकीतील मानाच्या गणपतींचे पुण्याच्या बेलबाग चाैकात मुस्लिम बांधवांकडून स्वागत करण्यात येते. यंदा मानाच्या गणपतींच्या अध्यक्षांना अरेबियन शाल, श्रीफळ व अत्तर लावून त्यांचे स्वागत करण्यात आले. दि मुस्लिम औकाफ वेलफेअर ट्रस्टचे कार्याध्यक्ष मुश्ताक पटेल व पुणे विघ्नहर्ता न्यासचे विश्वस्त डाॅ. मिलिंद भाेई यांच्यावतीने हा उपक्रम राबविण्यात आला.
विसर्जन मिरवणुक बेलबाग चाैकात आल्यानंतर मुस्लिम बांधवांकडून मानाच्या गणपतींचे स्वागत करण्यात आले. मानाच्या गणपतींच्या अध्यक्षांना अरेबियन शाल, श्रीफळ व अत्तर लावून त्यांचे स्वागत करण्यात आले. त्याचबराेबर मुस्लिम बांधवांनी मानाच्या गणपतींची आरती देखील यावेळी केली. तसेच मानाच्या गणपतींच्या पालखीचे सारथ्य केले. या उपक्रमाबाबत बाेलताना मुश्ताक पटेल म्हणाले, मुस्लिम समाजाबाबतचे गैरसमज दूर करण्यासाठी तसेच समाजात सर्वधर्म समभाव रुजावा यासाठी हा उपक्रम आम्ही राबवताे.
दरम्यान सकाळी 9 वाजता बंदाेबस्ताला असलेले पाेलीस, डाॅक्टर, गृहरक्षक दलाचे कर्मचारी व स्वच्छता कर्मचाऱ्यांना शिरखुर्म्याचे वाटप करण्यात आले. या उपक्रमावेळी मुश्ताक पटेल, मिलिंद भाेई, बाबर खान, प्रमाेद बाेराडे, मारुफ पटेल आदी उपस्थित हाेते.