विसर्जन मिरवणुकीसाठी पालिका सज्ज; वैभवशाली विसर्जन मिरवणुकीला सकाळी ९.३० वाजता सुरुवात होणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 5, 2025 18:24 IST2025-09-05T18:24:43+5:302025-09-05T18:24:57+5:30

सर्व विसर्जन स्थळांच्या ठिकाणी नागरिकांना बसण्यासाठी खुर्च्या, टेबल, मांडव, हिरकणी कक्ष, विद्युत, कॅमेरे, स्वच्छता आदींची व्यवस्था करण्यात आली आहे

Municipality ready for immersion procession; The grand immersion procession will begin at 9.30 am | विसर्जन मिरवणुकीसाठी पालिका सज्ज; वैभवशाली विसर्जन मिरवणुकीला सकाळी ९.३० वाजता सुरुवात होणार

विसर्जन मिरवणुकीसाठी पालिका सज्ज; वैभवशाली विसर्जन मिरवणुकीला सकाळी ९.३० वाजता सुरुवात होणार

पुणे : लाडक्या बाप्पाला उत्साही आणि आनंदमय वातावरणात निरोप देण्यासाठी पालिका प्रशासनाने शहरातील विसर्जन घाटांवर तीन शिफ्टमध्ये कर्मचारी तैनात केले आहेत. विसर्जनासाठी शहरात विविध ठिकाणी व्यवस्था करण्यात आली आहे. विसर्जनाच्या ठिकाणी निर्माल्य कलश, कंटेनर, मंडप आदी व्यवस्था केली आहे. महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांच्या हस्ते सकाळी ९ वाजून १५ मिनिटांनी महात्मा फुले मंडई येथील लोकमान्य बाळ गंगाधर टिळक आणि लोकनेते यशवंतराव चव्हाण यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून पुण्याच्या वैभवशाली विसर्जन मिरवणुकीला सुरुवात होईल.

सर्व विसर्जन स्थळांच्या ठिकाणी नागरिकांना बसण्यासाठी खुर्च्या, टेबल, मांडव, हिरकणी कक्ष, विद्युत, कॅमेरे, स्वच्छता आदींची व्यवस्था करण्यात आली आहे. विसर्जन हौदांची दुरुस्ती करून त्यात स्वच्छ पाणी भरण्यात आले आहे. याशिवाय शहरात विसर्जन मार्गावर मोबाइल टॉयलेटची व्यवस्था करण्यात आली आहे.

हे आहेत विसर्जन घाट

संगम घाट, नेने / आपटे घाट, वृद्धेश्वर घाट / सिद्धेश्वर घाट, ओंकारेश्वर, अष्टभूजा मंदिर (नारायण पेठ), पुलाची वाडी, नटराज सिनेमा मागे, बापू घाट (नारायण पेठ), खंडोजी बाब चौक, विठ्ठल मंदिर (अलका चौक), गरवारे कॉलेजची मागील बाजू, ठोसर पागा घाट, दत्तवाडी घाट, राजाराम पूल घाट, सिद्धेश्वर मंदिर, औंधगाव घाट, चिमा उद्यान येरवडा, बंडगार्डन घाट, वारजे कर्वेनगर, गल्ली क्र. १ नदी किनार, पांचाळेश्वर या घाटावर विसर्जनाची तयारी करण्यात आली आहे.

अग्निशमन दल सुरक्षेसाठी कटिबद्ध

गणेश विसर्जनाच्या वेळी नदी घाटांवर संभाव्य दुर्घटना टाळण्यासाठी अग्निशमन विभागानेही सर्वतोपरी तयारी केली आहे. मुठा नदीकाठच्या एकूण १८ घाटांवर भाविकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने दरवर्षीप्रमाणे यावर्षीही पुणे मनपा अग्निशमन दलाच्या वतीने जीवरक्षक तैनात करण्यात आले आहेत. या कर्मचाऱ्यांकडे लाइफ जॅकेट, लाइफ बॉय असे साहित्य असणार आहे. याशिवाय जागोजागी नदीपात्रात आडवा दोरही बांधण्यात आला आहे. त्यामुळे नदीत बुडणाऱ्या व्यक्तीला मदत मिळू शकणार आहे.

३२८ ठिकाणी निर्माल्य संकलन व्यवस्था

शहरातील ३२८ ठिकाणी निर्माल्य संकलनासाठी विशेष व्यवस्था महापालिकेकडून करण्यात आली आहे. शहरात २८१ ठिकाणी ६४८ लोखंडी टाक्यांची व्यवस्था केली आहे.

पालिकेचा आपत्ती व्यवस्थापन कक्ष

विसर्जनासाठी महापालिकेने आपत्ती व्यवस्थापन कक्षाची स्थापनाही केली आहे. या विभागाचे ०२०-२५५०१२६९, २५५०६८०० हे दूरध्वनी क्रमांक असून, त्यावर नागरिकांनी संपर्क साधावा, असेही आवाहन महापालिकेतर्फे करण्यात आले आहे.

क्षेत्रीय कार्यालयांचीही जय्यत तयारी

पालिकेच्या १५ क्षेत्रीय कार्यालयांनी त्यांच्या परिसरातील सार्वजनिक स्वच्छता, मिरवणूक मार्गावरील स्वच्छता, औषधोपचार, ग्रुप स्विपिंग, कंटेनगर, निर्माल्य कलश, कीटकनाशक फवारणी, विद्युत यंत्रणा, प्रकाश व्यवस्था, ध्वनिक्षेपक यंत्रणा, जलवाहिनी, मलवाहिनी यांची गळती झाल्यानंतर ती त्वरित दुरुस्त करण्यासाठी पथक, फिरती स्वच्छतागृहे, सूचना फलक आदी तयारी केली आहे.

१५ क्षेत्रीय कार्यालये
३८ कृत्रिम हौद
२४१ मूर्ती दान केंद्रे
२८१ ठिकाणी ६४८ लोखंडी टाक्या
२४१ ठिकाणी मूर्ती संकलन केंद्रे
३२८ निर्माल्य कलश
५५४ मोबाइल टॉयलेट

Web Title: Municipality ready for immersion procession; The grand immersion procession will begin at 9.30 am

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.