Municipal election 2026: "कुछ कह गए, कुछ..."; निष्ठावतांच्या आक्रोशानंतर भाजपा खासदार मेधा कुलकर्णींचा संताप
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 31, 2025 18:20 IST2025-12-31T18:18:45+5:302025-12-31T18:20:41+5:30
महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपामध्ये मोठ्या प्रमाणात इनकमिंग झाले. पण, याचा फटका थेट पक्षाचे काम करणाऱ्या निष्ठावंताना बसल्याचे दिसले. अनेक पक्षाच्या कार्यकर्त्यांना डावलून बाहेरून आलेल्यांना तिकीटे देण्यात आली.

Municipal election 2026: "कुछ कह गए, कुछ..."; निष्ठावतांच्या आक्रोशानंतर भाजपा खासदार मेधा कुलकर्णींचा संताप
छत्रपती संभाजीनगर, पुणे, अकोला, धुळे या महापालिकांसह राज्यभरात अनेक ठिकाणी भाजपाच्या निष्ठावंतांचा संताप बघायला मिळाला. अनेक वर्षांपासून काम करत असताना पक्षाने बाहेरून आलेल्यांना महापालिकांमध्ये उमेदवारी दिल्याने बराच गोंधळ झाला. यावरून ठिकाणी पक्षाबद्दलची नाराजी व्यक्त केली गेली. यावर आता भाजपाच्या खासदार मेधा कुलकर्णी यांनीही नाराजी व्यक्त करत पक्षाला सुनावले आहे.
उमेदवार अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी आणि अर्ज छाननीच्या दिवशी भाजपाच्या इच्छुक उमेदवारांचा संताप बघायला मिळाला. छत्रपती संभाजीनगरमध्ये तर आत्मदहनाचा प्रयत्न झाला. मंत्री अतुल सावे, माजी मंत्री भागवत कराड यांच्या गाड्यांना घेराव घातला गेला. पक्षाच्या कार्यकर्त्यांनी नेत्यांच्या गाड्या काळ्या केल्या. फोटोंना काळे फासले.
राज्यातील अनेक महापालिकांमध्ये ही दृश्य बघायला मिळाली. भाजपाच्या कार्यकर्त्यांनी पक्षाच्या या भूमिकेबद्दल खदखद व्यक्त करत पक्षाला आणि स्थानिक नेत्यांना सवाल केले. यात आता भाजपाच्या खासदार आणि माजी आमदार मेधा कुलकर्णी यांनीही उडी घेतली आहे.
मेधा कुलकर्णी काय म्हणाल्या?
खासदार मेधा कुलकर्णी यांनी एक पोस्ट केली आहे. त्या म्हणाल्या, "कुछ कह गए, कुछ सह गए. कुछ कहते कहते रह गए."
#निष्ठावानकार्यकर्तेpic.twitter.com/stfKS8FRa7
— Dr. Medha Kulkarni (@Medha_kulkarni) December 31, 2025
महापालिका निवडणुकीमध्ये भाजपाच्या निष्ठावंत कार्यकर्त्यांवर झालेल्या अन्यायावरून मेधा कुलकर्णी एक शेर पोस्ट करत पक्षालाच सुनावले आहे. त्यांनी पोस्ट करताना सुरूवातीलाच निष्ठावंत कार्यकर्ते असेही म्हटले आहे.
कार्यकर्त्यांचे व्हिडीओ व्हायरल
राज्यातील अनेक महापालिकांमध्ये भाजपाकडून तिकीट न देण्यात आल्याने कार्यकर्त्यांनी संताप व्यक्त केला. अनेक ठिकाणी इच्छुकांनी पक्षाच्या नेत्यांना प्रश्न केले. मंत्री, स्थानिक नेत्यांवर आरोप केले.
वेगवेगळ्या शहरांमध्ये घडलेल्या घटनांचे व्हिडीओ व्हायरल झाले आहेत. छत्रपती संभाजीनगरमध्ये तिकीट न दिल्याचे प्रकरण फारच चिघळले. बुधवारीही (३१ डिसेंबर) उमेदवारी न मिळालेल्या काही पदाधिकाऱ्यांनी पक्षाच्या मध्यवर्ती प्रचार कार्यालयात उपोषण सुरू केले होते. त्यानंतर बराच राडा झाला.