पुण्यातील गुन्हेगारीवरून मोहोळ-पवार आमनेसामने;
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 3, 2026 09:34 IST2026-01-03T09:33:46+5:302026-01-03T09:34:27+5:30
या आरोप-प्रत्यारोपांमुळे पुण्यातील राजकीय वातावरण अधिकच तापले असून, गुन्हेगारी हा मुद्दाच प्रचारात ऐरणीवर राहण्याची चिन्हे दिसत आहेत.

पुण्यातील गुन्हेगारीवरून मोहोळ-पवार आमनेसामने;
पुणे : महापालिका निवडणुकीच्या प्रचाराला सुरुवात होताच शहरातील गुन्हेगारीचा मुद्दा पुन्हा एकदा राजकारणाच्या केंद्रस्थानी आला आहे. गुन्हेगारीवरून केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यात जोरदार वाकयुद्ध पेटले असून, दोघेही एकमेकांवर थेट आरोप-प्रत्यारोप करताना दिसत आहेत.
राजकीय वातावरण तापले -
या आरोप-प्रत्यारोपांमुळे पुण्यातील राजकीय वातावरण अधिकच तापले असून, गुन्हेगारी हा मुद्दाच प्रचारात ऐरणीवर राहण्याची चिन्हे दिसत आहेत.
कोयता गॅंग संपली पाहिजे, सांगणाऱ्यांची उमेदवार यादी बघा म्हणजे कळेल...
भाजपने पुणे महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सुरू केलेल्या मीडिया सेंटरच्या उद्घाटनप्रसंगी बोलताना मुरलीधर मोहोळ यांनी अजित पवार यांच्यावर थेट टीका केली. ते म्हणाले, 'कोयता गँग संपली पाहिजे, पुण्यातील गुन्हेगारी संपली पाहिजे, असे पालकमंत्री सांगतात. मात्र, त्यांच्या उमेदवारांची यादी पाहिली तर टोकापासून टोकापर्यंत गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या लोकांना उमेदवारी देण्यात आली आहे. हे कोणत्या तत्त्वात बसते, हेच कळत नाही. अशा उमेदवारांमुळे पुण्यातील गुन्हेगारी वाढणार असून पुणेकर त्यांना मतदानातून चोख उत्तर देतील.'
तो गुन्हेगार परदेशात कसा काय पळाला? कोणाच्या शिफारशीने पासपोर्ट मिळाला?
अजित पवार यांनी पिंपरी-चिंचवड येथे बोलताना थेट पलटवार केला. ते म्हणाले, 'पुण्यातून एक गुन्हेगार व्यक्ती थेट परदेशात पळून गेली आहे. त्याला पासपोर्ट कोणी दिला? कसा दिला? याची सखोल चौकशी झाली पाहिजे. गुन्ह्याच्या आरोपाखाली असलेली व्यक्ती परदेशात कशी काय जाते? पासपोर्ट देताना काय तपासणी झाली, कोणाच्या शिफारशीने तो मिळाला, हे स्पष्ट व्हायला हवे. फक्त आरोप झाले म्हणजे कोणी गुन्हेगार ठरत नाही. मात्र, अशा संवेदनशील प्रकरणांत पारदर्शक चौकशी झाली पाहिजे. अन्यथा जनतेच्या मनात संशय निर्माण होतो. याची सविस्तर माहिती मी पत्रकार परिषदेत मांडणार असून, कोणाला वाचवण्यासाठी दबाव आहे का, याचाही खुलासा केला जाईल.'