मंगलमूर्ती मोरया! सिंह रथातून दिमाखदार मिरवणूक, श्रीमंत दगडूशेठ जटोली शिवमंदिरात विराजमान
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 7, 2024 14:58 IST2024-09-07T14:57:24+5:302024-09-07T14:58:02+5:30
मुख्य मंदिरापासून सकाळी ८.३० वाजता श्रींच्या आगमन मिरवणुकीला प्रारंभ झाला.

मंगलमूर्ती मोरया! सिंह रथातून दिमाखदार मिरवणूक, श्रीमंत दगडूशेठ जटोली शिवमंदिरात विराजमान
पुणे : श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरापासून गणपती बाप्पा मोरया... मंगलमूर्ती मोरयाच्या जयघोषात सिंह रथातून निघालेल्या दिमाखदार आगमन मिरवणुकीने वाजत गाजत जटोली शिवमंदिराच्या प्रतिकृतीमध्ये दगडूशेठचे गणपती बाप्पा विराजमान झाले. श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट, सुवर्णयुग तरुण मंडळच्या वतीने ट्रस्टच्या १३२ व्या वर्षानिमित्त आयोजित उत्सवाचा प्रारंभ हजारो भक्तांच्या साक्षीने झाला. गणेश चतुर्थीला सकाळी ११ वाजून ११ मिनिटांनी उत्सवाची पारंपरिक जागा असलेल्या जय गणेश प्रांगण येथे हिमाचल प्रदेशमधील जटोली शिवमंदिर प्रतिकृतीमध्ये कर्नाटक हुमनाबाद येथील श्री दत्त सांप्रदायाचे श्री ज्ञानराज महाराज माणिकप्रभू यांच्या हस्ते श्रींची प्राणप्रतिष्ठापना झाली.
यावेळी ट्रस्टचे अध्यक्ष माणिक चव्हाण, उपाध्यक्ष डॉ.रामचंद्र उर्फ बाळासाहेब परांजपे, उपाध्यक्ष सुनिल रासने, कोषाध्यक्ष महेश सूर्यवंशी, सरचिटणीस हेमंत रासने, उत्सव प्रमुख अक्षय गोडसे, सहचिटणीस अमोल केदारी, सुवर्णयुग तरुण मंडळाचे अध्यक्ष प्रकाश चव्हाण यांसह कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते. मुख्य मंदिरापासून सकाळी ८.३० वाजता श्रींच्या आगमन मिरवणुकीला प्रारंभ झाला.
मिरवणुकीमध्ये अग्रभागी देवळणकर बंधूंचा चौघडा, गायकवाड बंधू सनई, दरबार बँड, प्रभात बँड, मयूर बँड यांसह गंधाक्ष ढोल ताशा पथक देखील सहभागी झाले होते. मुख्य पूजा मिलींद राहुरकर आणि नटराज शास्त्री गुरुजी यांच्या पौरोहित्याखाली झाली. श्रींची विलोभनीय मूर्ती डोळ्यात साठविण्यासोबतच दर्शनासाठी भक्तांनी चौका-चौकात गर्दी केली. मंदिरापासून निघालेली मिरवणूक तांबडी जोगेश्वरी मंदिर, अप्पा बळवंत चौक, नगरकर तालीम चौक, शनिपार चौक, टिळक पुतळा मंडई मार्गे उत्सव मंडपात आली.