manache Ganapathi stay on ten and half time in ganesh visarjan miravnuk | साडेदहाच्या वेळेवर मानाचे गणपती ठाम : हस्तक्षेप केल्यास मूर्ती विसर्जित न करण्याचा इशारा
साडेदहाच्या वेळेवर मानाचे गणपती ठाम : हस्तक्षेप केल्यास मूर्ती विसर्जित न करण्याचा इशारा

ठळक मुद्देविसर्जन मिरवणूक प्रारंभाचा वेळ बदलणार नाहीमानाच्या मंडळांनी आपली भूमिका स्पष्ट करताना दिले इतिहासातील दाखले

पुणे : गणेशोत्सव विसर्जन मिरवणूक सकाळी साडेदहा वाजताच सुरू करण्यावर मानाचे पहिली पाच गणपती मंडळे ठाम आहे. परंपरेप्रमाणे सुरू असलेल्या या मिरवणुकीत बदल केल्यास आम्ही आमच्या श्रीं च्या मूर्ती विसर्जित करणार नाही, असा इशारा या मंडळांनी पोलिस प्रशासनाला दिला आहे़. 
श्री कसबा गणपती सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ ट्रस्ट, तांबडी जोगेश्वरी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, श्री गुरूजी तालीम मंडळ, श्री तुळशीबाग सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ ट्रस्ट व श्री केसरीवाडा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या अध्यक्षांनी लेखी पत्राव्दारे आपले म्हणणे पोलिसांना कळविले आहे़. 
आपली भूमिका स्पष्ट करताना या मंडळांनी इतिहासातील दाखले देऊ केले आहेत़. गणेशोत्सव व त्याची विसर्जन मिरवणुकीने होणारी सांगता याने शहराची ओळख संपूर्ण जगात झाली आहे़. ही विसर्जन मिरवणूक सुनियोजित व शिस्तबध्द व्हावी़, यासाठी लोकमान्य टिळक यांनी १२६ वर्षांपूर्वी त्यांच्या सहकाऱ्यांशी सल्ला मसलत करून मिरवणुकीत प्रमुख मंडळांनी सहभागी होण्यासाठीची तर्कसंगत क्रमवारी निश्चित केली आहे़. मानाचे पाच गणपती ही मिरवणूक याच तर्कसंगत क्रमवारीनुसार कायदा व सुव्यवस्थेला बाधा न आणता अव्याहतपणे सुरू आहे़. 
परंतू या सुव्यवस्थेला छेद देण्याविषयीची चर्चा सध्या सुरू असून, यामुळे संभ्रमाचे वातावरण निर्माण केले जात आहे़. ही असंदिग्धता उत्सव काळात कायम राहिली अथवा वरील विसर्जन मिरवणुकीच्या सुव्यवस्थेत बदल केल्यास आम्ही आमच्या श्रीं च्या मूर्ती विसर्जित करणार नाही़. तसेच असे झाल्यास कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊन पुण्यातील ऐतिहासिक व वैभवशाली मिरवणुकीस गालबोट लागेल़. याबाबतीत प्रशासनाने आमच्यावर अकारण दबाव टाकण्याचा प्रयत्न केला तर आम्ही आमच्या श्रींच्या मुर्तींचे विसर्जन करणार नाही, असेही या मंडळांनी स्पष्ट केले आहे़. 
दरम्यान पोलिसांनी याबाबत आपली भूमिका स्पष्ट करावी, असे आवाहनही या मंडळानी या पत्रद्वारे केले आहे़. 

Web Title: manache Ganapathi stay on ten and half time in ganesh visarjan miravnuk

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.