Maharashtra Election 2019 : Voting percentage steady in the parvati : enthusiasm for the middle class | महाराष्ट्र निवडणूक २०१९ : पर्वतीमधील मतदानाचा टक्का स्थिर : मध्यमवर्गीयांमध्ये उत्साह 

महाराष्ट्र निवडणूक २०१९ : पर्वतीमधील मतदानाचा टक्का स्थिर : मध्यमवर्गीयांमध्ये उत्साह 

ठळक मुद्देझोपडपट्टी बहुल भागात उत्साह तुलनेने कमी, निवडणूक आयोगाकडून चोख व्यवस्थावस्त्या, चाळी आणि झोपडपट्ट्यांमधील मधील मतदार दुपारनंतर बाहेर पडले.

पुणे : दक्षिण पुण्याचे प्रतिनिधीत्व करणाऱ्या पर्वती मतदार संघामध्ये उत्साहात मतदान पार पडले. विशेषत: मध्यमवर्गीय मतदारांकडून मतदानाला चांगला प्रतिसाद मिळाला. तर, वस्त्या, चाळी आणि झोपडपट्ट्यांमधील मधील मतदार दुपारनंतर बाहेर पडले. पावसाने उघडीप दिल्याने मतदार सकाळपासूनच बाहेर पडायला सुरुवात झाली होती. निवडणूक आयोगाने ६४ केंद्रांवरील ३४४ खोल्यांवर चोख व्यवस्था ठेवली होती. २०१४ साली पर्वतीमध्ये ५५ टक्के मतदान झाले होते. यंदाही हा टक्का स्थिर राहण्याची शक्यता आहे. 
 सकाळी सात वाजल्यापासूनच सोसायटी भागांमधील नागरिकांनी मतदानासाठी मतदान केंद्रांवर गर्दी करायला सुरुवात केली होती. दुपारी काही प्रमाणात ओसरलेली गर्दी संध्याकाळी पुन्हा वाढली. झोपडपट्ट्या, सोसायट्या, चाळी, उपनगरांचा समावेश हा मतदार संघ संमिश्र लोकवस्तीचा आहे. मध्यमवर्गीय मतदारांची महत्वाची ‘पॉकेट्स’ मतदार संघात आहेत. या पॉकेट्सवर लक्ष केंद्रित करीत प्रमुख राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांनी मतदार बाहेर काढण्यासाठी प्रयत्न केले. सकाळी ढगाळ वातावरण असल्याने सुरुवात काहीशी मगरळलेली झाली होती. परंतू, नऊनंतर ऊन पडू लाग्ल्याने मतदार बाहेर पडले. 
सकाळपासूनच बिबवेवाडी, सहकारनगर, अरण्येश्वर, पर्वती, सिंहगड रस्ता, सॅलिसबरी पार्क, मुकुंदनगर, गुलटेकडी, महर्षीनगर, सातारा रस्ता परिसरामध्ये कार्यकर्त्यांनी आपापल्या पक्षांमार्फत मतदार सहाय्य कक्ष उभारले होते. टेबल टाकून त्यावर मतदार याद्या घेऊन बसलेले कार्यकर्ते जागोजाग दिसत होते. अनेक मतदार याद्या तपासून स्लिपा घेऊन जात होते. विविध शाळा आणि महाविद्यालयांमध्ये असलेल्या मतदान केंद्रांवर मतदार पोचत होते. ज्येष्ठ नागरिक, महिलांसह तरुणांचा उत्साह दिसत होता. काही ठिकाणी मतदार याद्यांमध्ये नावच न आल्याने काही मतदारांना परत जावे लागले. तर एक-दोन ठिकाणी मतदान केंद्र बदलल्याने मतदारांचा गोंधळ उडाला होता. मतदान केंद्रांवर सकाळी दिसत असलेली गर्दी दुपारी कमी झाली होती. मात्र, संध्याकाळी पुन्हा मतदार उत्साहाने बाहेर पडल्याचे पहायला मिळाले. 
बिबवेवाडीतील सिताराम आबाजी बिबवे शाळा, इंदिरानगर, महर्षीनगर येथील संत ज्ञानदेव व संत नामदेश शाळा, कटारीया हायस्कूल, सहकारनगरचे शिंदे हायस्कूल, अध्यापक महाविद्यालय, संदेशनगरमधील पालिका शाळेमध्ये मतदानाचा उत्साह दिसून आला. 
====
निवडणूक आयोगाकडून मतदान केंद्रांवर ज्येष्ठ नागरिकांसाठी सुविधा पुरविण्यात आल्या. पाण्याची व्यवस्था आणि जलद गतीने मतदान कसे होईल याकडे विशेष लक्ष देण्यात आले होते. यासोबतच दिव्यांग मतदारांसाठी तसेच वयोवृद्ध मतदारांकरिता सर्व मतदार केंद्रांवर व्हिल चेअरची व्यवस्था करण्यात आली होती. 
====
 पर्वती मतदार संघातील शकुंतला शिंदे संकुल, बॅडमिंटन हॉल, बिबवेवाडी येथील मतदान केंद्रावर अभियंता अमोल देशपांडे यांच्या नावाने बोगस मतदान झाले. देशपांडे सकाळी सव्वाआठच्या सुमारास मतदानाला गेले असता त्यांच्या नावावर साडेसातच्या सुमारास आधीच मतदान झाल्याचे निदर्शनास आले. लोकसभा निवडणुकीतही देशपांडे यांना असाच अनुभव आला होता. हा प्रकार देशपांडे यांनी केंद्राध्यक्षांच्या निदर्शनास आणून दिल्यावर त्यांचे टेंडर (प्रदत्त) मतदान घेण्यात आले.
====
सहकारनगर येथील अध्यापक महाविद्यालयातील मतदान केंद्रावर सकाळी मतदानाकरिता आलेले सहा ते सात ज्येष्ठ नागरिक रस्त्यावरील शेवाळामुळे घसरुन पडले. त्यातील एका ज्येष्ठाच्या डोक्याला जबर दुखापत झाली. बंदोबस्तावर असलेले पोलीस हवालदार प्रविण जगताप आणि पीडब्ल्यूडीचे प्रवीण देवरुखकर यांनी या ज्येष्ठाला रिक्षामध्ये बसवून घरी पाठवून दिले. त्यानंतर अशी दुर्घटना होऊ नये म्हणून रस्त्यावर ग्रीन कार्पेट टाकण्यात आले  होते. 
=====
2014 विधानसभा निवडणूक
एकूण मतदार        : 3, 40, 050
एकूण मतदान        : 1, 89, 767
टक्केवारी        : 55%
.............
2019 लोकसभा निवडणूक
एकूण मतदान        : 1, 83, 470
टक्केवारी        : 52.07

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Maharashtra Election 2019 : Voting percentage steady in the parvati : enthusiasm for the middle class

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.