Maharashtra Election 2019 : Traditional voters in Kasba assembly constituency call for voting after afternoon | महाराष्ट्र निवडणूक २०१९ : कसबा विधानसभा मतदारसंघातील पारंपारिक मतदारांनी दुपारनंतर मतदानासाठी मुहूर्त साधला
महाराष्ट्र निवडणूक २०१९ : कसबा विधानसभा मतदारसंघातील पारंपारिक मतदारांनी दुपारनंतर मतदानासाठी मुहूर्त साधला

ठळक मुद्देमतदान केद्रांवरील वर्ग खोल्यांबाहेर मतदारांच्या लागल्या होत्या रांगा

पुणे :  पावसाने उघडीप दिली असली तरी शनिवार-रविवार जोडून आलेल्या सुट्टीचा काहीसा परिणाम कसबा पेठ मतदारसंघातील मतदानावर झाल्याचे पाहायला मिळाले. पारंपरिक मतदारांनी दुपारी तीन नंतर मतदानासाठी मुहूर्त साधला. यावेळेत मतदान केद्रांवरील वर्ग खोल्यांबाहेर मतदारांच्या रांगा लागल्या होत्या. यामध्ये विशेषत: महिलांचे प्रमाण अधिक होते. कसबामध्ये यंदा संध्याकाळी ५ वाजेपर्यंत ३६.०८ टक्के मतदान झाले होते.  
 कसबा विधानसभा मतदार संघामध्ये सकाळी सात वाजल्यानंतर काही मतदान केंद्रांवर अगदी तुरळक प्रमाणात मतदान झाले. पर्वती, सारसबाग, महाराणा प्रताप उद्यान, वा. द. वर्तक उद्यान येथे पहाटे फिरण्यासाठी घराबाहेर पडलेल्यांपैकी काही जणांनी तसेच वेगवेगेळ्या हास्यक्लबमधील ज्येष्ठ नागरिकांनी थेट मतदान केंद्र गाठून आपला मतदानाचा हक्क बजावला. नोकरी-व्यवसायासाठी घराबाहेर पडणाऱ्या नोकरदारांनी कामावर जाण्यापूर्वी मतदानाचे कर्तव्य पार पाडले. 
महापौर मुक्ता टिळक यांनी कुटुंबीयांसमवेच केळकर रस्त्यावरील श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी कन्याशाळा येथील मतदान केंद्रावर मतदानाचा हक्क बजावला. खासदार गिरीश बापट यांनी कुटुंबीयांसमवेत अहिल्यादेवी प्रशालेमध्ये मतदानाचा हक्क बजावला. पत्नी गिरिजा, पुत्र गौरव आणि स्नुषा स्वरदा या वेळी उपस्थित होत्या. अनेक मतदारांनी निवडणूक आयोगाकडून मतदार स्लिप मिळाल्या नसल्याच्या तक्रारी केल्या.  
नाना वाडा, केळकर रस्त्यावरील नूतन मराठी विद्यालय प्राथमिक शाळा, कन्या शाळा, गोगटे प्रशाला, बाजीराव रस्त्यावरील सरस्वती विद्या मंदिर, नूमवि प्रशाला, आदर्श विद्यालय, रेणुका स्वरूप प्रशाला, दारुवाला पुलाजवळील आरसीएम प्रशाला या पेठांमधील मतदान केंद्रामध्ये सकाळी अकरा वाजेपर्यंत मतदारांची रांग लागली होती. कसब्यातील बहुतांश मतदान केद्रांतील वर्गखोल्या तळमजल्यावरच होत्या. त्यामुळे अपंग, अपघातग्रस्त मतदारांना फारसा त्रास झाला नाही. शिवाजी मराठा हायस्कूल,नूमवि प्रशालेमध्ये ज्येष्ठ नागरिक आणि अपंगांना मतदान सुलभपणे करता यावे यासाठी रिक्षाने आतपर्यंत सोडण्यात आले. अनेक ठिकाणी व्हीलचेअरची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली होती. पावसाने विश्रांती घेतल्यानंतर कडक ऊन पडल्यामुळे दुपारी बारानंतर मतदान केंद्रे ओस पडू लागली. त्यामुळे केंद्रावरील कर्मचाऱ्यांना काही काळासाठी विसावा मिळाला. तुरळक असणाऱ्या मतदारांची संख्या सायंकाळी साडेचारनंतर वाढू लागली आणि अनेक मतदान केंद्रातील वर्गखोल्यांबाहेर मतदारांच्या रांगा लागल्या होत्या. मध्यवर्ती भागातील पेठांपेक्षाही गणेश पेठ, रास्ता पेठ सारख्या भागांमधील केंद्रावर गर्दी झाल्याचे पाहायला मिळाले. संवेदनशील भागांमध्ये तैनात करण्यात आलेल्या पोलिसांकडूनही ज्येष्ठ नागरिक आणि महिलांना सहकार्य करण्यात येत येत होते. शेवटच्या टप्प्यातही काही भागांमध्ये मतदान सुरूच असल्याचे पाहायला मिळाले.
.................................

Web Title: Maharashtra Election 2019 : Traditional voters in Kasba assembly constituency call for voting after afternoon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.