Maharashtra Election 2019 :bjp will be victory in kasba ? | Maharashtra Election 2019 : कसबा मतदारसंघात कमळ फुललेलेच राहणार... की?
Maharashtra Election 2019 : कसबा मतदारसंघात कमळ फुललेलेच राहणार... की?

ठळक मुद्देबंडखोरीची चर्चा : काँग्रेस आशावादी; शहरात राज्यस्तरीय नेत्यांच्या सभांचा धडाका.. कसबा मतदारसंघामधील मतदान साधारणपणे ५० ते ६० टक्क्यांच्या पुढे जाते.

पुणे : भाजपच्या मुक्ता टिळक, काँग्रेसचे अरविंद शिंदे, शिवसेनेचे बंडखोर विशाल धनवडे व मनसेचे अजय शिंदे अशी चौरंगी लढत कसबा विधानसभा मतदारसंघात आहे. भाजपा, काँग्रेस अशी प्रमुख लढाई असली तरी धनवडे, शिंदे किती मते मिळतात. यावर भाजप-काँग्रेसच्या विजयाचे गणित अवलंबून आहे. धनवडे, शिंदे भाजपची मते खातील व फायदा होईल, असे काँग्रेसला वाटते आहे. तर धनवडे, शिंदे यांची उमेदवारी फार परिणामकारक नसेल, असे भाजपच्या सामान्य कार्यकर्त्यापासून ते थेट वरिष्ठ नेत्यांपर्यंत सर्वांचेच ठाम मत आहे. त्यामुळे भाजपलाही विनाअडथळा विजयाची पुनरावृत्ती करण्याची खात्री वाटते.
शहरात राज्यस्तरीय नेत्यांच्या सभा होत असल्या तरी कसब्यात अजून भाजपची एकही मोठी सभा झालेली नाही. ‘‘पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा माझ्या मतदारसंघात होत आहे,’’ असे मुक्ता टिळक म्हणतात. महापौरपदाच्या कारकिर्दीचाही लाभ मिळण्याची आशा वाटते. तुलनेने मतदारसंघाबाहेरचा रहिवास, मदतीला पक्षाकडेच नेते नाहीत, केंद्रातून, राज्यातून येणारे कोणी नाहीत तरीही अरविंद शिंदे यांनी संपर्कावर जोर दिला आहे. शिवसैनिकांची नाराजी गोळा करण्याची धनवडे यांची धडपड चालू आहे. तर अजय शिंदे यांची सगळी मदार राज ठाकरे यांच्या सभेला झालेल्या गर्दीचे रूपांतर मतात होण्यावर आहे. कसबा हा पुण्यातला सर्वात जुना मतदारसंघ. सगळ्या पेठाच, त्याही अस्सल पुणेकरांच्या. पण हे चित्र बदलते आहे.
पक्क्या बांधकामांच्या अतिक्रमणांना अभय
४मतदारसंघातील समस्या - इमारती, रस्ते, वाहने व माणसे यांची प्रचंड दाटीवाटी, जुन्या वाड्यांचा प्रश्न गंभीर. सततची वाहनकोंडी. रस्त्यांची कायमची दुर्दशा. सार्वजनिक आरोग्याकडे दुर्लक्ष, नद्यांमध्ये प्रदूषण, पदपथांचे सततचे खोदकाम, वीज, पाणी यात अनियमितता. पदपथांवर कायमचे अतिक्रमण, पक्क्या बांधकामांच्या अतिक्रमणांना अभय. नव्या सार्वजनिक मंडईची गरज. 
४मतदारसंघाची राजकीय स्थिती - गेले सलग ५ वेळा भाजपचाच विजय. काँग्रेससह मनसेचीही दोन वेळा लक्षणीय लढत, मात्र अयशस्वी. शिवसेनेच्या बंडखोरीला प्रतिसाद, भाजप, काँग्रेसमधील नाराज प्रचारापासून दूर, मतदारांना आकर्षित करण्यात सर्वच राजकीय पक्ष कमी. मोठ्या सभांची वानवा. पुण्याचे पहिले महापौर बाबूराव सणस यांच्यानंतर प्रथमच महापौर पदावरील व्यक्ती आमदारपदासाठी निवडणुकीत.
........
जिंकण्यासाठी ५५ ते ६० हजार मते
कसबा मतदारसंघामधील मतदान साधारणपणे ५० ते ६० टक्क्यांच्या पुढे जाते. म्हणजे  २ लाख ९० हजार ६८३ मतदारांपैकी सुमारे १ लाख ५० ते ७० हजारपर्यंत मतदानाची शक्यता आहे. १५ ते २० हजारपेक्षा जास्त मतदान घेणाºया उमेदवारांची चार ही संख्या लक्षात घेता त्यांच्यातील ५० ते ६० हजार मतदान एकगठ्ठा घेईल तो उमेदवार विजयी होईल, असे ढोबळमानाने सांगता येते.

Web Title: Maharashtra Election 2019 :bjp will be victory in kasba ?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.