महाराष्ट्र निवडणूक २०१९ : प्रसंगावधानता दाखवत प्रशासनाने ''अशी '' लढवली शक्कल ज्याने मतदान केंद्र झालं ''हाउसफुल्ल''
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 21, 2019 15:32 IST2019-10-21T15:03:23+5:302019-10-21T15:32:06+5:30
Baramati Election 2019 : या प्रकारामुळे हे मतदान केंद्र चांगलेच चर्चेत आले...

महाराष्ट्र निवडणूक २०१९ : प्रसंगावधानता दाखवत प्रशासनाने ''अशी '' लढवली शक्कल ज्याने मतदान केंद्र झालं ''हाउसफुल्ल''
बारामती : दोन दिवस पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे कांबळेश्वर (ता. बारामती) येथील मतदान केंद्राच्या बाहेर मोठ्याप्रमाणात पाणी साठले होते. प्रशासनाने याठिकाणी ट्रॅक्टरच्या सहा ट्रॉली एकमेकाला जोडून मतदारांसाठी तात्पुरता ट्रॉलींचा पुल उभा केला. या प्रकारामुळे हे मतदान केंद्र चांगलेच चर्चेत आले. तसेच प्रशासनाने दाखवलेल्या प्रसंगावधानाबद्दल कौतुकही करण्यात आले. याबाबत माहिती देताना तहसिलदार विजय पाटील म्हणाले, मागील दोन दिवसांपासून या भागात सतत पाऊस सुरू आहे. त्यामुळे कांबळेश्वर येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या समोर मोठ्याप्रमाणात पाणी साठले होते. त्यामुळे मतदान केंद्रामध्ये जाणे कठिण झाले होते. त्यामुळे तातडीने याठिकाणी ट्रॅक्टरच्या ट्रॉलींचा तात्पुरता पुल उभा करण्यात आला आहे.याठिकाणी दोन मतदान केंद्रे आहेत. येथे एकूण २ हजार ९५ मतदान आहे. पाऊसाने सकाळपासून उघडीप दिल्याने मतदानासाठी मोठ्याप्रमाणात नागरिक
बाहेर पडत आहेत. मात्र या मतदान केंद्राच्या समोरील पाण्याचा निचरा झाला असला तरी येथे मोठ्याप्रमाणात चिखल झाला आहे. त्यामुळे संपूर्ण मतदान होईपर्यंत ट्रॉली ठेवण्यात येणार आहेत. दरम्यान दुपारी एक वाजेपर्यंत बारामती तालुक्यात ३७ टक्के मतदान झाले होते.
------------------------