'त्या' शोरूममध्ये काहीच आढळलं नाही; श्रीनिवास पवारांचा अजित पवारांवर निशाणा
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 19, 2024 13:04 IST2024-11-19T13:03:43+5:302024-11-19T13:04:56+5:30
बारामती मतदारसंघात युगेंद्र पवार पैसे वाटप करत असल्याचा आरोप झाल्यानंतर पोलिसांनी त्यांच्या शरयु मोटर्स शोरूममध्ये तपासणी करण्यात आली.

'त्या' शोरूममध्ये काहीच आढळलं नाही; श्रीनिवास पवारांचा अजित पवारांवर निशाणा
पुणे - बारामतीच्या हायप्रोफाईल लढतीकडे राज्याचे लक्ष लागले आहे. त्यातच मतदानाच्या आदल्या दिवशी युगेंद्र पवार यांच्याकडून पैसे वाटप सुरू असल्याचा आरोप विरोधकांनी केला. त्यानंतर युगेंद्र पवार यांचे वडील श्रीनिवास पवार यांच्या शरयु मोटर्स शोरूममध्ये पोलिसांच्या पथकाने सर्च ऑपरेशन केले परंतु तिथे काहीही आढळलं नसल्याची माहिती निवडणूक अधिकाऱ्यांनी दिली. यात आता श्रीनिवास पवार यांनी अजित पवारांवर निशाणा साधला आहे.
श्रीनिवास पवार म्हणाले की, आमचे बंधू अजित पवार हे भाजपासोबत आहेत त्यामुळे त्यांच्याकडून ते या गोष्टी शिकत आहेत. आम्हाला बारामतीतून अपेक्षा आहे. शरद पवारांची ही बारामती आहे त्यांनी केलेल्या आवाहनाला लोक साथ देतील. तक्रार आल्यानंतर पोलीस पथक तपासायला आले, कॅबिन चेक केले पण काही मिळाले नाही म्हणून गेले. सत्तेत असल्यामुळे काहीजण करत असतील असं सांगत त्यांनी अप्रत्यक्षपणे अजित पवारांवर निशाणा साधला.
तर रात्री १० वाजता पोलिसांचे पथक आले, शरयु मोटर्स शोरुममध्ये तपासणी केली. आम्ही कायदा पाळणारे लोक आहोत, तिथे काही मिळाले नाही. आम्ही तपासाला सहकार्य करू. खरेतर असे का केले, कुणी तक्रार दिली हे विचारतोय पण ते सांगत नाहीत. जे पोलीस अधिकारी आहेत त्यांनी का आणि कुणाच्या सांगण्यावरून केले हे जोपर्यंत आपल्यासमोर तथ्य येत नाही त्यावर बोलणे योग्य नाही. पहिल्यांदाच अशाप्रकारे चौकशी झाली आहे. आम्ही सामोरे जायला तयार आहोत असं राष्ट्रवादी शरद पवार गटाचे उमेदवार युगेंद्र पवार यांनी म्हटलं आहे.
दरम्यान, बारामती शहरापासून काही अंतरावर असलेल्या शरयु टोयाटो शोरुम हे श्रीनिवास पवार यांच्या मालकीचे आहे. तिथे रात्री पैसे वाटप केल्याची तक्रार अज्ञाताने केली होती. शरयु टोयाटो इथं पैशाचे वाटप सुरू आहे. त्यानंतर आम्ही त्याठिकाणी तपास केला मात्र तक्रारीत कुठलेही तथ्य आढळून आलेले नाही अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी वैभव नावडकर यांनी दिली.