राष्ट्रवादीनेच हक्काचा प्रभाग गमावला, अंतर्गत गटबाजीचा फटका; माळेगावात राजकीय चर्चेला उधाण
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 28, 2025 15:07 IST2025-12-28T15:06:30+5:302025-12-28T15:07:24+5:30
- या निवडणुकीत पाच अपक्ष उमेदवारांनी विजय मिळविल्याने शहरातील राजकीय समीकरणे बदलली असून, त्याची जोरदार चर्चा सुरू आहे.

राष्ट्रवादीनेच हक्काचा प्रभाग गमावला, अंतर्गत गटबाजीचा फटका; माळेगावात राजकीय चर्चेला उधाण
माळेगाव : माळेगाव नगरपंचायत निवडणुकीच्या नुकत्याच जाहीर झालेल्या निकालावरून राष्ट्रवादी काँग्रेसचा पराभव विरोधकांपेक्षा स्वतःच्या अंतर्गत गटबाजीमुळेच झाल्याचे स्पष्ट झाले आहे. या निवडणुकीत पाच अपक्ष उमेदवारांनी विजय मिळविल्याने शहरातील राजकीय समीकरणे बदलली असून, त्याची जोरदार चर्चा सुरू आहे.
यातील सर्वाधिक चर्चेचा विषय ठरला तो प्रभाग क्रमांक ९. या प्रभागात निवडणूक अतिशय अटीतटीची झाली. राष्ट्रवादीकडून उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे विश्वासू मानले जाणारे ॲड. राहुल तावरे यांच्या पत्नी ॲड. गायत्री राहुल तावरे यांना उमेदवारी देण्यात आली होती. त्यांच्या विरोधात जयश्री बाळासो तावरे निवडणूक रिंगणात होत्या. अत्यंत चुरशीच्या लढतीत चिठ्ठीद्वारे जयश्री तावरे विजयी ठरल्या.
प्रभाग क्रमांक ९ हा राष्ट्रवादीचा बालेकिल्ला मानला जातो. माळेगाव शहर राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अध्यक्ष दादा जराड हे या प्रभागातील रहिवासी असून, माळेगाव साखर कारखान्याचे निवृत्त कर्मचारी मोठ्या संख्येने येथे वास्तव्यास आहेत. त्यामुळे हा प्रभाग राष्ट्रवादीचा सर्वांत सुरक्षित मानला जात होता. गायत्री तावरे यांना उमेदवारी मिळाल्यानंतर त्यांना माळेगावमधील सर्वाधिक मताधिक्य मिळेल, असा अंदाज व्यक्त होत होता.
मात्र, स्थानिक राजकारणातील अंतर्गत संघर्षाने या अंदाजांना छेद दिला. गायत्री तावरे निवडून आल्यास आपले राजकीय महत्त्व कमी होईल, या भीतीपोटी राष्ट्रवादीतीलच एका युवा नेत्याने आपल्या पदाचा गैरवापर करत त्यांच्या पराभवासाठी सक्रिय प्रयत्न केल्याचा आरोप होत आहे. अजित पवार यांनी दिलेल्या उमेदवारालाच उघड विरोध करण्याचे धाडस या युवा नेत्याने केल्याने माळेगावात खळबळ उडाली आहे.
विशेष म्हणजे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगता सभेत स्पष्ट निर्देश दिले होते की, “मी दिलेल्या उमेदवारांच्या पाठीशी सर्वांनी ठाम उभे राहावे. माझ्यानंतर कोणी वेगळा विचार केल्यास त्याच्याकडील पदाचा राजीनामा घेतला जाईल व त्याला पदावरून हटवले जाईल.” मात्र या निर्देशांकडे सोयीस्कर दुर्लक्ष करत संबंधित युवा नेत्याने गायत्री तावरे यांच्या पराभवात महत्त्वाची भूमिका बजावल्याची चर्चा आहे. आता पक्षविरोधी भूमिका घेतल्याचा आरोप असलेल्या या युवा नेत्यावर अजित पवार कारवाई करणार की अभय देणार, याकडे संपूर्ण माळेगावचे लक्ष लागले आहे.