श्रीगणेशाच्या कृपेने माझ्या घरात लक्ष्मी जन्माला आली....

By ऑनलाइन लोकमत | Published: September 14, 2019 07:00 AM2019-09-14T07:00:00+5:302019-09-14T07:00:02+5:30

गणेशोत्सवात कायदा आणि सुरक्षेचा कुठलाही प्रश्न निर्माण होऊ नये याकरिता पोलीस प्रशासन डोळ्यात तेल घालून पहारा देते....

Lakshmi was born in my house by the grace of Sriganesh.. | श्रीगणेशाच्या कृपेने माझ्या घरात लक्ष्मी जन्माला आली....

श्रीगणेशाच्या कृपेने माझ्या घरात लक्ष्मी जन्माला आली....

googlenewsNext
ठळक मुद्देमुलगी झाल्याचा आनंद सगळ्यांसमवेत केला साजरा :  पोलीस कॉन्स्टेबल संपते पुन्हा ड्युटीवर हजर

युगंधर ताजणे-  

पुणे :  डॉक्टरांनी येत्या मंगळवारची तारीख मंडळींना दिली होती. त्यामुळे विसर्जनाचे काम उरकता येईल असा विचार होता. मात्र नेमकं अनंत चतुर्दशीच्या दिवशी तीच्या पोटात दुखु लागले. तिला जवळच्या एका रुग्णालयात दाखल करण्यात आले. मला ताबडतोब निघुन ये असा फोन आला. वरिष्ठांना तसे कळवले. त्यांनी लागलीच जाण्याची परवानगी दिली. पत्नीच्या हाकेला ओ देत रुग्णालयात गेलो. ती सुखरुप बाळंत झाली. श्री गणेशाच्या कृपेने माझ्या घरात लक्ष्मी जन्माला आली. पोलीस हवालदार शंकर संपते यांच्या डोळ्यातून भावना व्यक्त करताना आनंदाश्रु येत होते. 
   पुण्यातील गणेशोत्सवातील शेवटचा दिवस म्हणजे समस्त पुणेकरांना आनंदाची आणि उत्साहाची पर्वणी असते. अशा या उत्साहातील कायदा आणि सुरक्षेचा कुठलाही प्रश्न निर्माण होऊ नये याकरिता पोलीस प्रशासन डोळ्यात तेल घालून पहारा देते. गुन्हे शाखेच्या युनिट चार मध्ये पोलीस कॉन्स्टेबल म्हणून काम करणा-या शंकर यांना गणेश विसर्जन मिरवणूकीच्या दिवशी अलका चौकात ड्युटी होती. ठरल्या वेळेप्रमाणे  ते आपल्या कामाच्या ठिकाणी हजर झाले. यांच्या पत्नीला डॉक्टरांनी बाळंतपणाकरिता 17 फेब्रुवारी ही तारीख दिली  होती. त्या दरम्यान त्या बाळंत होतील. असा अंदाज डॉक्टरांनी शंकर यांच्याजवळ व्यक्त केला होता. यामुळे त्यांना विसर्जन मिरवणूकीतील आपली जबाबदारी पार पाडण्याकरिता कुठली अडचण येणार नव्हती. मात्र गुरुवारी दुपारी तीनच्या सुमारास संपते यांना पत्नीचा फोन आल्यानंतर पत्नीने त्यांना पोटात खुप दुखत असल्याचे सांगितले. दरम्यान  त्यांच्या पत्नीला घरच्यांनी जवळच्या एका रुग्णालयात दाखल केले. 
   पत्नीचा फोन येताच शंकर यांनी त्वरीत आपले वरिष्ठ अधिकारी पोलीस उपआयुक्त (गुन्हे) बच्चन सिंग आणि अतिरिक्त पोलीस आयुक्त (गुन्हे)व अलका चौकातील बंदोबस्ताचे प्रमुख अशोक मोराळे यांना प्रत्यक्ष भेटून घटनेची माहिती दिली. त्यांनी शंकर यांना तातडीने रुग्णालयात जाण्याचा सल्ला देऊन पत्नीची काळजी घेण्यास सांगितले. यावेळी  त्यांच्या पत्नीजवळ आई आणि इतर नातेवाईक रुग्णालयात उपस्थित होते. गुरुवारी रात्री आठच्या सुमारास त्यांच्या पत्नीने एका मुलीला जन्म दिला. त्यावेळी शंकर यांच्या आनंदाला पारावार उरला नाही. गणेशाच्या आशीवार्दाने आपल्या घरात लक्ष्मी आल्याची भावना त्यांनी व्यक्त करुन आता कुठलीही काळजी करण्याची गरज नसून पुन्हा कामाला रुजु होण्याची परवानगी पत्नीकडे मागितली. तिने त्यांना पुन्हा कामावर जाण्यास सांगितले. अन संपते पुन्हा अलका चौकातील बंदोबस्तावर हजर झाले. 
..............
वरिष्ठांना मी कामावर हजर झाल्याचे कळल्यानंतर त्यांनी मला कारण विचारले. त्यांना मुलगी झाल्याचे कळताच सर्वांनी मनपूर्वक शुभेच्छा देऊन अभिनंदनाचा वर्षाव केला. मित्रांना देखील मुलगी झाल्याची गोड बातमी समजली. त्यांनीही आनंद व्यक्त केला. गणेश विसर्जन मिरवणूकीतील कामाचा ताण क्षणात दूर होऊन मन आनंद व समाधाने फुलून गेले. बाप्पाने एक गोंडस व सुंदर भेट मला दिली. याकरिता मी त्याचा नेहमीच कृतार्थ आहे. वास्तविक त्यादिवशी सुट्टी घेऊन घरच्यांसमवेत मुलीच्या जन्माचे स्वागत करता येणे सहज शक्य होते. मात्र तो आनंद सगळयांसमवेत वाटून घेण्याची इच्छा असल्याने पुन्हा अलका चौकात दाखल झालो. - शंकर संपते (पोलीस हवालदार, गुन्हे शाखा युनिट 4) 
 

Web Title: Lakshmi was born in my house by the grace of Sriganesh..

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.