Pune Crime: यवतमध्ये बँक ऑफ महाराष्ट्रचे ATM फोडून लाखो रूपये लंपास
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 17, 2022 13:15 IST2022-01-17T13:12:30+5:302022-01-17T13:15:23+5:30
यवतमध्ये काही महिन्यांपूर्वी महामार्गालगत असलेले एस बी आय बँकेचे एटीएम मशीनची चोरी झाली होती

Pune Crime: यवतमध्ये बँक ऑफ महाराष्ट्रचे ATM फोडून लाखो रूपये लंपास
यवत (पुणे): यवत येथे पुणे-सोलापूर महामार्गालगत असलेले बँक ऑफ महाराष्ट्रचे एटीएम मशीन गॅस कटरच्या साहाय्याने फोडून चोरांनी लाखो रूपयांच्या रकमेवर डल्ला मारला आहे. यवत पोलीस ठाण्यापासून अगदी जवळच्या अंतरावर असणाऱ्या बँक ऑफ महाराष्ट्रचे एटीएम मध्यरात्री २ नंतर चोरांनी गॅस कटरच्या साहाय्याने फोडले. तसेच यावेळी मशीन मध्ये वीस लाख रुपयांपेक्षा जास्तीची रक्कम असल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. यातील काही रक्कम काढता न आल्याने एटीएम मशीन मध्ये तशीच राहिली तर मोठी रक्कम काढून चोरांनी पोबारा केला आहे.
यवतमध्ये काही महिन्यांपूर्वी महामार्गालगत असलेले एस बी आय बँकेचे एटीएम मशीनची चोरी झाली होती. त्यानंतर आता परत चोरांनी महामार्गालगत असलेले महाराष्ट्र बँकेचे एटीएम मशीन गॅस कटरने फोडून मोठी चोरी केली आहे. चोरांनी नेमकी किती रक्कम चोरून नेली याबाबतची गणती अद्याप सुरू आहे.
अपर पोलीस अधीक्षक मिलिंद मोहिते यांनी घटनास्थळी भेट देऊन तपासाबाबत पोलिसांना सूचना केल्या. तत्पूर्वी घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक नारायण पवार, सहायक पोलीस निरीक्षक स्वप्नील लोखंडे, पोलीस उपनिरीक्षक संजय नागरगोजे व पोलीस पथकाने घटनास्थळी येऊन पाहणी केली. श्वान पथकाला देखील पाचारण करण्यात आले होते.