Social Viral: युती-आघाड्यांतील खिचडी कोणाची, डाळ कोणाची आणि शिजवली कोणी, हेच कळेना!
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 3, 2026 14:09 IST2026-01-03T14:08:38+5:302026-01-03T14:09:11+5:30
दिसायला सगळे जोडलेले; पण फ्यूज कधी उडेल सांगता येत नाही!’ तर काहींनी ‘ओव्हरलोड झाले की शॉर्टसर्किट अटळ’ असा अर्थपूर्ण इशारा देखील दिला आहे

Social Viral: युती-आघाड्यांतील खिचडी कोणाची, डाळ कोणाची आणि शिजवली कोणी, हेच कळेना!
पिंपरी : भिंतीवरील प्लग पॉइंटचा हा फोटो सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे. सॉकेटमध्ये सॉकेट, त्यात पुन्हा मल्टिप्लग, त्यात पुन्हा ॲडाॅप्टर आणि त्यातून लोंबकळणाऱ्या वायर... पाहणाऱ्याला नेमके कुठे काय जोडलेले आहे, कोण कुणाशी कसे कनेक्ट आहे, हेच उमजेनासे होते. नेमकी हीच भावना सध्या महापालिका निवडणुकीत युती आणि आघाड्यांविषयी असल्याच्या पोस्ट नेटिझन्सकडून सोशल मीडियावर शेअर होत आहेत.
एका प्लगवर किती भार टाकायचा, यालाही मर्यादा असते; पण इथे तर मर्यादा, नियम, सुरक्षितता सगळेच दोन हातावर ठेवून राजकारण रंगल्याचे चित्र दिसत आहे. ‘कोणाचा प्लग कोणत्या सॉकेटमध्ये आहे, कुणाचा स्विच ऑन आहे आणि कोणाचा कधी ऑफ होईल, याचा काही नेम नाही’, अशी कमेंटसुद्धा नेटकरी करत आहेत. ‘कोण कोणासोबत आहे? कोण कुणापासून दूर? आणि कोण केवळ वायर लावून पाहतेय?’ असा प्रश्न विचारत अनेकांनी हा फोटो राजकीय स्थितीशी जोडला आहे.
‘युती की आघाडी? की नवीच जुळवाजुळव?’ अशा ओळींसह हा फोटो व्हायरल होत असून, त्यावर ‘मीम्स’चा अक्षरशः पाऊस पडत आहे. यावर एका नेटिझनने तर थेट लिहिले आहे, ‘राजकारणातले गठबंधन म्हणजे अगदी असेच. दिसायला सगळे जोडलेले; पण फ्यूज कधी उडेल सांगता येत नाही!’ तर काहींनी ‘ओव्हरलोड झाले की शॉर्टसर्किट अटळ’ असा अर्थपूर्ण इशारा देखील दिला आहे.
पिंपरी-चिंचवडमध्येही गोंधळात गोंधळ
पिंपरी-चिंचवड महापालिकेत महायुती-महाआघाडीत गोंधळ उडाला आहे. जागा वाटपावर तडजोड न झाल्यामुळे सगळे स्वतंत्र लढत आहेत. राष्ट्रवादी (शरद पवार) आणि राष्ट्रवादी (अजित पवार) हे अचानक एकत्र आले, तर उद्धवसेनेने मनसे आणि रासपशी युती केली. भाजपने रिपाइंसोबत (आठवले गट) काही जागांवर उमेदवारीचे वाटप केले. काँग्रेसने स्वतंत्र उमेदवार दिले. त्यामुळे ‘खिचडी कोणाची आणि डाळ कोणाची आणि शिजवली कोणी, हे कळेना कोणालाच?’ अशी स्थिती पिंपरी-चिंचवड महापालिकेत दिसते आहे.